स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मंगळवार, दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टी व असामान्य परिस्थितीमुळे मुंबईची जिवनवाहीनी असलेल्या रेल्वेच्या तीनही मार्गावरील सेवा प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे कामावरुन घरी जाणारे चाकरमनी, महिला व वयोवृध्द प्रवाशी अनेक ठिकाणी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यामध्येच अडकून पडले होते. या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल व उरण या सर्व मार्गांवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी असतानाही व या वाहतूक कोंडीत उपक्रमाच्या ५० हून अधिक बसेस अडकल्या असतानाही रात्री १२ वाजेपर्यंत ५२ जादा बसेसव्दारे बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. नेहमी जास्त पाऊस झाल्यावर उपक्रमाचे उत्पन्न कमी होते. परंतू २९ ऑगस्ट रोजी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देवून प्रवाशांना अतिरिक्त बस सेवा दिली. त्यामुळे उपक्रमाच्या उत्पन्नात सुमारे दोन लाख रुपयांनी वाढ झाली आहे.
बुधवार, दि. ३० ऑगस्ट रोजी रेल्वे सेवा पुर्ववत न झाल्यामुळे उपक्रमाकडून मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल व उरण या मार्गावर ४५ जादा बसेसव्दारे बससेवा देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी एनएमएमटीच्या बसेसना अधिक प्राधान्य देवून या सेवेचा लाभ घेतला. यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल व उरण मार्गावरील प्रवाशी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचार्यांना धन्यवाद देत आहेत. नेहमीच आपत्कालीन परिस्थितीत फक्त एनएमएमटीच्या बसेसच रस्त्यावर धावतात हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालेले आहे.