नवी मुंबई : भजनसम्राट म्हणून गौरविले जाणारे नवी मुंबईतील ज्येष्ठ भजन गायक हंसारामबुवा नेरूळकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दु:खद निधन झाले असून आज नेरूळगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्री.नामदेव भगत व श्री.गिरीश म्हात्रे, श्री.हरीभाऊ म्हात्रे, श्री.रामभाऊ पाटील तसेच श्री. निवृत्तीबुवा चौधरी, महादेवबुवा शहाबाजकर, गोवर्धनबुवा पाटील बेतवडेकर आणि भजन क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भजनाच्या माध्यमातून देशभक्तीचा अविष्कार करणा-या हंसारामबुवांनी अखेरच्या क्षणापर्यंत भजनाशी जुळलेले आपले अभंग नाते सोडले नाही. महाराष्ट्रभर विविध गावांमध्ये 10 हजाराहून अधिक भजनाच्या कार्यक्रमांतून त्यांनी नामसंकीर्तनाचा गजर केला. 24 नाटकांना तसेच 500 हून अधिक गीतांना त्यांनी सुरेल संगीतसाज चढविला आहे. दूरदर्शन व आकाशवाणीवर त्यांनी सादर केलेले भजनाचे कार्यक्रम रसिकप्रिय ठरले. 100 हून अधिक अभंग आणि गौळणी रचणा-या हंसारामबुवांनी शेकडो शिष्य घडविले आहेत. सहा नाटकात अभिनय व 28 नाटकांसाठी हार्मोनियमची साथ करताना त्यांनी 350 हून अधिक डबलबारीचे कार्यक्रम केले आहेत. नवी मुंबई कलासंकुल या संस्थेने त्यांना भजन सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेनेही नवी मुंबई रत्न हा मानाचा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या भजन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केलेला आहे.
प्रसिध्दीच्या हव्यासापासून दूर राहून निरपेक्ष वृत्तीने भजनाच्या माध्ममातून कलासेवा करणा-या हंसारामबुवांनी हयातभर सांप्रदायीक एकता जपली व जोपासली. त्यांच्या जीवनावरील “भजन यात्री” हे चरित्र त्यांचे सुपुत्र व संगीत विशारद अमृत पाटील नेरुळकर यांनी लिहिले असून त्यामध्ये बाबा महाराज सातारकर, संगीतकार यशवंत देव, महादेवबुवा शहाबाजकर, गजानन म्हात्रे अशा नामवंतांनी हंसारामबुवांच्या कारकिर्दीचा गौरव केलेला आहे. हंसारामबुवांच्या रुपाने नवी मुंबईच्या भजन क्षेत्रातील वटवृक्ष हरपला अशीच भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.