पनवेल : (खास प्रतिनिधी) :
पतंजली योग समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत असतात. त्या अंतर्गत कामोठे येथे नुकतेच सह योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. तसेच अनंत चतुर्दशी निमित्त गणेश भक्तांना पौष्टिक खाऊचे वाटप केले. पतंजली योग समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
पतंजली योग समितीच्या वतीन कामोठे येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात विविध विषयांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात शरीर विज्ञान, प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार, योग मुद्रा, ऍक्यूप्रेशर, नेती, धौती आणि त्राटक यावर शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले. तसेच घरात
नियमित वापरण्यात येणार्या वस्तुंच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करण्याची माहितीही तज्ज्ञांनी दिली.
कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट मंदिरात या शिक्षण-प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या शिबिरात परिसरातील ३० जणांनी सहभाग घेतला. शिबिरानंतर प्रशिक्षणार्थींची लेखी आणि प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात आली. यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पतंजली योग समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे मत पतंजली योग समितीचे जिल्हा प्रमुख आर. पी. यादव यांनी म्हटले आहे.
तसेच पतंजली योग समितीच्या वतीने गणेश भक्तांना ठिक ठिकाणच्या विसर्जन घाटावर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौष्टीक खाऊचे वाटप करण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त एकत्र येत असतात. या भक्तांना प्रेरणा मिळावी यासाठी पतंजली योग समितीद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात परिसरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामोठे, खारघर, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील विसर्जन तलावाच्या ठिकाणी पतंजली योग समिती निर्मित पौष्टीक खाउच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. योग समितीचे जिल्हा प्रभारी आर. पी. यादव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, योग शिक्षक आणि साधक या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाचे गणेश भक्तांनी उत्स्ङ्गूर्तपणे स्वागत केले.