रायपूर : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांची पत्नी आणि खासदार डिंपल यादव या यापुढे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा केली आहे. रायपूरमध्ये रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांना घराणेशाहीसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
यादव महासभेच्या एका कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून अखिलेश यादव रायपूरमध्ये आले. स्वामी विवेकानंद विमानतळावरही त्यांनी घराणेशाहीवरील प्रश्नाला उत्तर दिले. समाजवादी पक्षात घराणेशाही नाही, यापुढे माझी पत्नी डिंपल यादव निवडणूक लढवणार नाही असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी माझी मैत्री कायम आहे, उत्तर प्रदेशची निवडणूक आम्हाला जिंकता आली नाही तरीही आमच्या मैत्रीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता छत्तीसगढमध्ये समाजवादी पार्टीचा विस्तार करण्याचे उद्दीष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे असेही यादव यांनी सांगितले.