मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरूण साधू यांच्या निधनाने पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा पुरोगामी उदारमतवादी लेखक हरपला आहे, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
अरूण साधू यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात अरूण साधू यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. ३० वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अरुण साधू यांनी केसरी, इंडियन एक्स्प्रेस,टाइम्स ऑफ इंडिया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल अशी विविध वृत्तपत्रे व टाईम सारख्या जगप्रसिध्द साप्ताहिकांतून काम केलं. सिंहासन सारख्या राजकीय कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी समकालीन इतिहासाचंही लेखन केलं. जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत साधू यांनी मराठी वाचकांपर्यंत पोहोचविला.
अरूण साधू यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी साधू कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.