मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधु यांच्यात निधनाने पत्रकारीता आणि साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणारे व्यकक्तिमत्व गमावले असल्याची प्रतिक्रीया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र शब्दबध्द करण्यासाठी अरुण साधु यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणारे असल्याची आठवणही त्यांनी जागृत केली.
आपल्या शोक संदेशात विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी म्हटले आहे की, साहित्य आणि पत्रकारीता क्षेत्रात अरुण साधु यांनी केलेले काम हे निश्चितच मोलाचे आहे. विविध वृत्तपत्रातून आपल्या लिखाणाची त्यांची वेगळी शैली वाचकांपर्यंत पोहचली. विविध साहित्यकृती निर्माण करतानाच ‘सिंहासन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील निर्मित झालेल्या चित्रपटाच्या कथा अरुण साधु यांच्या लेखणीतूनच पुढे आल्या. साहित्य आणि पत्रकारीता विश्वातील योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांचा झालेला सन्मान हा एकप्रकारे मराठी साहित्य विश्वाचा सन्मान होता. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आम्ही भाग्य समजतो.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आग्रहाखातर पद्मश्रीच्या चरित्राची मांडणी डॉ.अरुण साधू यांनी केली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र मराठीमध्ये ‘सहकार धुरिण’ आणि इंग्रजी भाषेत ‘पायोनिअर’च्या माध्यमातून शब्दबध्द करण्यासाठी अरुण साधु यांनी दिलेले योगदान हे विखे पाटील परिवाराच्या सदैव स्मरणात राहणारेच आहे. या चरित्राच्या निमित्ताने अरुण साधु यांच्या समवेत व्यक्तिश: मला त्यांचा मिळालेला सहवास आणि मार्गदर्शन हे निश्चितच मोलाचे राहीले. त्यांच्या निधनानं प्रवरा परिवारालाही मोठे दु:ख आहे. अरुण साधु यांना माझी भावपुर्ण श्रध्दांजली.
दरम्यान, विखे पाटील परिवाराच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई पाटील यांनी अरूण साधू यांचे मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले.