नवी मुंबई : जेव्हा जेव्हा माथाडी कामगारांवर संकटे आली तेव्हा तेव्हा आपण मा. पवारसाहेबांकडे धावून गेलो आहोत. त्याच पद्धतीने आज जेव्हा मी मुख्यमंत्र्याकडे माथाडी कामगारांचे प्रश्न घेवून गेलो, तर साहेब तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन आ. नरेंद्र पाटील यांनी केले आहे. माथाडी कामगारांचे नेते आदरणिय अण्णासाहेब पाटील याच्या जयंतीनिमित्त सोमवारी नवी मुंबईत झालेल्या माथाडी कामगाराच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.
अण्णासाहेबांची जयंती आणि मा. पवार साहेबांच्या सत्काराचे औचित्य साधून आ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांचा ऊहापोह केला. माथाडी कामगारांची चळवळ ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादीत न राहता देशभरात पसरली पाहिजे, असे ते म्हणाले. अण्णासाहेब पाटलांच्या नावाने आर्थिक महामंडळ आहे त्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी मदत केलीय. तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यानी माथाडी कामगारांना घरासाठीही मदत केली आहे. त्याच पद्धतीने आता मराठा समाजाला आरक्षणाचे जे आश्वासन देण्यात आले आहे, त्याचीही लवकर पूर्तता व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करत माथाडी कामगाराचे प्रश्न सोडवण्याचे काम जर मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचा सत्कार करण्याचा विचारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनिल तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचीही भाषणे झाली. आपल्या भाषणात मा. तटकरे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी माथाडी कामगारांचे मोठे काम आहे. भुमिपुत्रांना साडेबारा टक्के जमीन देण्याचे काम मा. पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळे माथाडींच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्याशी जेव्हा बैठक असेल तेव्हा पवारसाहेबांनी उपस्थित राहावे,म्हणजे कामे होतील, असेही तटकरे म्हणाले. तर गणेश नाईक म्हणाले की,मा. अण्णासाहेबांचे अनंत उपकार कामगारांवर आहेत. जे माथाडी कामगारांच्या कायम स्मरणात राहतील. त्याच पद्धतीने समाजातील प्रत्येक घटकांच्या दु:खावर फुंकर मारण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे. तर भाजपचे नेते प्रसाद लाड म्हणाले की, माथाडींचा प्रश्न घेवून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी गेलो, प्रत्येक वेळी त्यांनी मदत करण्याचीच भुमिका घेतलीय. यापुढेही कामगारांच्या मुलांचे प्रश्न कसे सोडवता येतील, यासाठी आपण प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यानी जो शब्द दिला आहे, त्याच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.