*** कामगारमंत्री मा. संभाजी पाटील निलंगेकर यांचा कॉंग्रेस नेतृत्वाला सवाल
*** घराणेशाहीच्या मुद्यावरून आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनीही केले कॉंग्रेसला लक्ष्य
नांदेड : आतापर्यंत देशातील ज्या दहा कुटूंबांना सर्वात जास्त सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली, त्यापैकी एक कुटूंब नांदेडचे आहे. एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत असूनही नांदेडच्या जनतेला उपाशी ठेवण्याचेच काम नांदेडच्या कॉंग्रेस नेतृत्वाने केले, अशा शब्दांत कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रचाराच्या पहिल्याच जाहीर सभेत घराणेशाहीच्या मुद्यावरून कॉंग्रेसला लक्ष्य केले. तर आगामी महापालिकेत परिवर्तन अटळ असून राजेशाही, नव्हे तर सर्व सामान्यांची सत्ता येईल, असे ठणकावत भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.
येत्या ११ आॅक्टोबरला नांदेड महापालिकेसाठीचे मतदान होत असून विजयादशमीचा मुहूर्त साधत भाजपने निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्याचा शुभारंभ केला. प्रचार सभेला सुरुवात करण्यापुर्वी मुंबईत परळ- एलफिस्टन रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर घडलेल्या दुर्देवी घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आपल्या भाषणात निलंगेकर पाटील यांनी कॉग्रेसचे स्थानिक खासदार अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, नांदेडच्या जनतेला यंदा दोन वेळा दिवाळी साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ज्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाने नांदेडवर आजपर्यंत फक्त राज्य केले, त्यांना महाराष्ट्र सोडाच किमान नांदेडचाही विकास करता आला नाही. आगामी काळात भावनिक राजकारणावर नव्हे तर विकासाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे, असे सांगत निलंगेकर पाटील म्हणाले की, तुम्ही तब्बल वीस वर्षे कॉंग्रेसच्या हाती सत्ता दिली त्यांनी इतक्या वर्षांत नांदेडसाठी काय केले याचा विचार करून मतदान करा. नांदेडमध्ये जशी कॉंग्रेसची सत्ता आहे, त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून नागपुरची सत्ता भाजपकडे आहे. मात्र नागपूरकरांना स्वछ पाणी, सिटी बस, सीसीटीव्ही, मेट्रो यासारख्या सुविधा मिळाल्या. पण नांदेडकरांना काय मिळाले असा सवाल करत ते म्हणाले की, फक्त निवडणूकीत भावनिक राजकारण करायचे, स्थानिक नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे हेच उद्याेग इथल्या कॉंग्रेस नेतृत्वाने केले. ‘गुरु ता गद्दी’साठी केंद्र सरकारने पैसे दिले पण तरीही विकास झाला नाही, असा आरोप करत त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वरांचे स्मारक होणार असल्याची ग्वाही नांदेडकरांना दिली.
याच सभेत आ. सुजितसिंह ठाकुर यांनीही आपल्या भाषणात नांदेडमधील भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करून नांदेड भ्रष्टाचार आणि कॉंग्रेसमुक्त करण्याचे आवाहन नांदेडवासियांना केले. तसेच केंद्रात आणि राज्यात सरकार होते तेव्हा नांदेडसाठी काहीच करु न शकलेले आता म्हणतात घरकूल देऊ, पण आता सत्तेतून पायउतार झाल्यावर तुम्ही काय करणार, असा सवाल करत त्यांनी भाजपच गरीबांना घरे देईल, असे आश्वासन दिले. आपल्या भाषणात त्यांनी जातीपातीच्या राजकारणावरही टीका केली. कॉंगेसने मुस्लीम आणि दलितांकडे केवळ वोटबॅंक म्हणून पाहिले. पण त्यांच्यासारखे आमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे नाहीत, असे सांगत डॉ. बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी संघर्ष केल्याची आठवण करून दिली. ते पुढे म्हणाले की, सत्तेत असताना कॉंग्रेसने कधीच डॅा. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र भाजपच्या सरकारने डॅा. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडन येथील निवासस्थान विकत घेऊन तिथे स्मारकाचे कामही मार्गी लावले आहे. काही लोक दिल्लीतून मुंबईत आले, मुंबईत येऊन ‘आदर्श’ केले आणि तिथून निघून आता नांदेडला आलेत, असा खोचक टोला हाणत त्यांनी नांदेडवासियांना सत्ता बदलाचे आवाहन केले.