नवी मुंबई : नावातच नवेपण असलेले नवी मुंबई शहर सतत नाविन्य जपत असून कोपरीगांव येथे उभारण्यात आलेल्या ॲम्युजमेंट पार्कमधील वेगळेपण नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच नवी मुंबईत येणा-या सर्वांचेच आकर्षण असेल असे सांगत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी खेळण्यांवर मनसोक्त खेळणा-या मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेह-यावरील आनंद बघून समाधान वाटते असे मनोगत व्यक्त करीत यापुढील काळात नवी मुंबई पर्यटन नगरी म्हणून पुढे येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी सेक्टर 26 कोपरीगाव येथे प्लॉट क्र. 5 वर उभारण्यात आलेल्या ॲम्युझमेंट पार्कच्या लोकार्पण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, ड प्रभाग समिती अध्यक्ष संगीता बो-हाडे, क प्रभाग समिती अध्यक्ष शशिकांत राऊत, आरोग्य समिती सभापती तथा स्थानिक नगरसेविका उषा भोईर, उद्यान समितीच्या सभापती जयश्री ठाकूर, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती प्रज्ञा भोईर, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, विभाग अधिकारी अनंत जाधव व महेन्द्रसिंग ठोके उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईत थिम पार्क ही अभिनव संकल्पना ठिकठिकाणी राबविली जात असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात विरंगुळ्याची ठिकाणे उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोपरीगाव परिसरात हे सुंदर पार्क उभे राहिल्याने नवी मुंबईतील गावांच्या विकासाला नवी दिशा लाभली असल्याचे सांगत त्यांनी सिडकोने नागरी सुविधांसाठीचे भूखंड महानगरपालिकेस लवकरात लवकर हस्तांतरित करावेत असे आवाहन केले.
उपमहापौर श्री. अविनाश लाड यांनी नवी मुंबईत घरी आलेल्या पाहुण्याला दाखविण्यासाठी हवी तेवढी ठिकाणे नाहीत, ही उणीव या पार्कने भरून काढली असल्याचे सांगत यापुढील काळात अशाचप्रकारे नवी मुंबईच्या पर्यटन विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या मनोगतात नवी मुंबईत 225 हून अधिक उद्याने असल्याने बंगलोरप्रमाणेच आता नवी मुंबई ही गार्डन सिटी म्हणून ओळखली जाते, त्यामध्ये कोपरीगावातील या पार्कने मोलाची भर टाकली असल्याचे सांगत हे पार्क नवी मुंबईचे विशेष आकर्षण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
स्थानिक नगरसविका तथा आरोग्य समितीच्या सभापती श्रीम. उषा भोईर यांनी ॲम्युझमेंट पार्कच्या रूपाने एक दर्जेदार सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध होत असल्याचा आनंद व्यक्त करीत या पार्कमधील महाकाय कासव हे मुंबईतील वाळकेश्वर येथील म्हातारीच्या बुटाप्रमाणे लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल व मुले हट्टाने आईवडिलांना येथे घेऊन येतील असे सांगितले.
सेक्टर 26 वाशी कोपरीगाव येथील प्लॉट नं. 5 वर 9788.17 चौ. मी. क्षेत्रफळात हा स्पेशल ॲम्युझमेंट पार्क विकसित करण्यात आला असून यामध्ये फेरोसिमेंटने उभारण्यात आलेल्या मोठ्या आकारातील कासवाची प्रतिकृती लांबूनच दिसत असल्याने सर्वांचेच लक्ष वधून घेते. याठिकाणी मुलांसाठी खास प्ले झोन असून त्यामध्ये खेळताना दुखापत होऊ नये याची विशेष काळजी घेत खाली उच्च दर्जाचे रबर मॅटचे फ्लोअरींग टाकण्यात आले आहे. येथे स्केटिग रिंग, इवेन्ट प्लाझा, ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्था अशा विविध सुविधांचा समावेश आहे. पार्कचे वास्तुविशारद सोपान प्रभू व कंत्राटदार मंगलमूर्ती एन्टरप्राईजस यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हा पार्क कायमस्वरूपी सुव्यवस्थित रहावा यादृष्टीने त्याची व्यवस्थित देखभाल होण्याकरिता याठिकाणी नागरिकांना परवडेल असे प्रवेशशुल्क ठेवावे असे मान्यवरांप्रमाणेच अनेक नागरिकांनीही सूचित केले.