नवी मुंबई : शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करुनही त्याची अंमलबजावणी न करणार्या भाजपा आणि शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलनाचा एल्गार केला आहे. रविवार १ ऑक्टोबर रोजी वाशी येथील शिवाजी चौकात नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन केले जाणार आहे. अशी महिती नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक आणि नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख, ज्येष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यात आत्तापर्यंत सुमारे १५ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेनंतर सरकारने शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली मात्र सरकारची नियत साफ नसल्याने प्रत्यक्षात कर्जमाफीची अमंलबजावणी होणे कठीण होवून बसले आहे. त्यातही १० ते १५ लाख शेतकरी बोगस आहेत, असे अपमानास्पद विधान एका ज्येष्ठ मंत्र्याने काढले आहेत. बळीराजाला बोगस म्हणणार्या सरकारला हुसकावून लावण्यासाठी आणि शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि जिल्हयाच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्यावतीन हे आंदोलन केले जाणार आहे.