संदीप खांडगेपाटील :८३६९९२४६४६
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व नवी मुंबई शिल्पकार लोकनेते गणेश नाईक हे त्यांच्या समर्थकांसह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिली जात आहे. मात्र विजयादशमीच्या दिनी नेरूळमधील एका मेडिकल स्टोअरचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणात नाईकांनी भाजपविरोधी सूर उघडपणे आळविल्याने नाईकांच्या भाजपप्रवेशामध्ये अडथळे निर्माण झाले असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकनेते गणेश नाईक हे संयमी व प्रगल्भ विचारसरणीचे नेतृत्व आहे. त्यांच्या भाषणांचा गेल्या दोन दशकातील गोषवारा घ्यावयाचा झाल्यास त्यांनी आपल्या भाषणातून कधीही कोणावर टीका केलेली नाही. शिवसेना सोडल्यावर छगन भुजबळ व नारायण राणे यांनी शिवसेना संघटनेवर तसेच शिवसेना नेतृत्वावर पातळी सोडून अनेकदा टीका केलेली आहे. मात्र गणेश नाईकांनी शिवसेना सोडून सतरा वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी शिवसेनेवर अथवा शिवसेनेच्या नेतृत्वावर जाहिरपणे तसेच खासगीतही टीका केलेली नाही. उलटपक्षी जाहिर कार्यक्रमात बोलताना ते शिवसेनेचा उल्लेख ‘पलीकडच्या घरात असताना’ याच स्वरूपात करतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विष्णूदास भावेतील मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची बडबड अथव गोंधळ सुरू असताना त्यांनी ‘पलिकडच्या घरात असताना एक शिस्त असायची’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना अनेकदा कानपिचक्याही दिलेल्या आहेत.
एप्रिल २०१४ साली झालेल्या मोदी लाटेच्या प्रभावामुळे लोकसभा निवडणूकीत डॉ. संजीव नाईक पराभूत झाल्यावर तसेच त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत स्वत: गणेश नाईक निसटत्या मतांनी पराभूत झाले. परंतु त्यानंतर सात महिन्यांनी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १११ पैकी ५२ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यात लोकनेते गणेश नाईकांना यश आले. अपक्षांच्या मदतीने बहूमत प्राप्त करताना महापालिका चालविताना कोणत्याही प्रकारची राजकीय अस्थिरता येवू नये यासाठी दहा नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसलाही गणेश नाईकांनी सत्तेत सहभागी करून घेतले.
गेल्या वर्षभरापासून गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सहा महिन्यापासून या चर्चांना उधान आले आहे. भाजपमध्ये नाही गेले तर शिवसेनेत जातील, पण राष्ट्रवादी सोडणारच अशाही राजकीय वर्तुळात गणेश नाईकांबाबत पैजा लागल्या होत्या. गणेश नाईक हे संयमी, शांत व प्रगल्भ विचारसरणीचे नेतृत्व असल्याने त्यांनी स्वत: कधीही या चर्चांचे खंडन केले नाही अथवा समर्थनही केले नाही. त्यामुळे नाईकांच्या संभाव्य राजकीय वाटचालीबाबत राजकीय क्षेत्राला ‘मोनालिसाच्या स्मितहास्या’प्रमाणे आजही गूढ वाटत आहे. नाईक भाजपमध्येच जाणार असल्याचे खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, नगरसेवकांमध्येही पडद्याआड चर्चा रंगू लागल्याने नाईक लवकरच भाजपमध्ये दिसणार असल्याचे नवी मुंबईकरही बोलू लागले होते.
विजयादशमीच्या दिनी नेरूळ सेक्टर चार येथील वाधवा टॉवरच्या तळमजल्यावर असलेल्या जी.डी.केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून भाषण करताना गणेश नाईकांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. बुलेट ट्रेनसह अन्य बाबींचाही भाषणात उघडपणे उहापोह केला. इंद्राच्या पुजेचा उल्लेख करत देवेंद्र, नरेंद्र असा उच्चारही केला. नाईकांच्या राजकीय भाषणातही नेहमीच विकासाच्या मुद्याचा उल्लेख असतो. पण नेरूळ पश्चिमेकडील मेडीकल स्टोअरचे उद्घाटन करताना सरकारच्या कारभारावर व धोरणावर नाईकांकडून जाहिरपणे टीका करण्यात आल्याने नाईक भाजपमध्ये जाणार नसल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. नाईकांनी भाजपवर टीका केल्यामुळे ते आता शिवसेनेत जाणार काय याचाही कानोसा आता राजकीय घटकांकडून घेण्यात येत आहे. नाईकांच्या राजकीय वाटचालीवर अनेकांची भावी राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने नाईकांच्या राजकीय वाटचालीच्या चर्चेला पडद्याआडून विरोधी पक्षातीलच काही घटक हवा घालत असल्याचे उघड होवू लागले आहे.