नवी मुंबई : गावातील व शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये फरक असून शहरातील ज्येष्ठांच्या गरजा ओळखून नवी मुंबई महानगरपालिका स्वत:हून पुढाकार घेत काम करीत असून ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा उपयोग शहराला पुढे नेण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विरंगुळा केंद्रे ही खरे तर शहराला मार्गदर्शन करणारी केंद्रे आहेत अशी भावना व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी आपल्या नवी मुंबई शहराने स्वच्छतेत देशातील आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेपावण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत स्वच्छतादूत बनून ओला-सुका कचरा वर्गीकरणाचा तसेच वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचा संदेश जनमानसात प्रसारित करावा असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी महापौर महोदयांसमवेत व्यासपिठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. संगिता बो-हाडे, कार्यक्रमाच्या निमंत्रक समाजकल्याण समिती सभापती श्रीम. अनिता मानवतकर व उपसभापती श्रीम. तनुजा मढवी, आरोग्य समिती सभापती श्रीम. उषा भोईर, विधी समिती सभापती श्री. गणेश म्हात्रे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, श्रीम. मिरा पाटील, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य श्री.डी.एम.चापके, श्री.भा.रा.शेजाळे, फेसकॉमचे उपाध्यश्र श्री. टेकाळे तसेच महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीने पुरवित असलेल्या सुविधांबद्दल कौतुक केले तसेच ज्येष्ठ नागरिक संघाने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री निधीला केलेल्या मदतीबद्दल त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव केला. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा उपयोग नेहमीच समाजाच्या हितासाठी होतो असे सांगत ज्येष्ठ नागरिकांप्रतीही समाजाने आपली बांधिलकी जपावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्त करताना फेसकॉमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. डी.एम.चापके यांनी ज्येष्ठांच्या गरजांचा विचार करून स्वत: पुढाकार घेत ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान वाटतो असे स्पष्ट करीत यामुळे ज्येष्ठांचा सन्मान करणारी संस्कृती नवी मुंबईत दिसून येते असे गौरवोद्गार काढले. सर्व सुविधांनी युक्त 20 विरंगुळा केंद्रे, एनएमएमटी बस प्रवास भाड्यात देशात सर्वाधिक 75 टक्के सवलत, आरोग्य सेवेत विनामूल्य औषधोपचार अशा विविध गोष्टी महानगरपालिका ज्येष्ठांसाठी पुरविते, त्यामुळे नवी मुंबई हे ज्येष्ठांसाठी सर्वात योग्य शहर म्हणून नावाजले जात असल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आगामी काळात नोकरी व्यवसाय करणा-या मुलासूनांच्या घरातील वृध्दांची काळजी घेणारी डे केअर सेंटर, जनऔषधी सेवा केंद्रे तसेच विविध सेवा केंद्र स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजकल्याण समितीच्या सभापती तथा कार्यक्रमाच्या निमंत्रक श्रीम. अनिता मानवतकर यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत यामधून ज्येष्ठांचा सन्मान करणे व त्यांच्या जीवनात आनंदरंग भरण्याचा प्रयत्न असल्याची भूमिका मांडली. उपमहापौर श्री. अविनाश लाड यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी वयाचा अमृतमहोत्सव 75 वर्षे पूर्ण करणा-या 188 जेष्ठांचा तसेच विवाहाचा सुवर्णमहोत्सव 50 वर्षे साजरा करणा-या 28 ज्येष्ठ दांम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कॅरम, बुध्दीबळ, गायन, काव्यवाचन, कथाकथन, वेशभूषा, नाटिका, एकपात्री अभिनय, निबंध स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी निषाद पवार आणि सहकारी यांनी सादर केलेल्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी साकारलेल्या विविध कलागुणदर्शनपर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी उत्कट दाद दिली.