नवी मुंबई : फिफा 17 वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धा नवी मुंबईमध्ये संपन्न होत असून नवी मुंबई महानगरपालिकेने स्पर्धेच्या अनुषंगाने जय्यत तयारी केली आहे. फिफाच्या आंतरराष्ट्रीय निकषानुसार नेरूळ, सेक्टर 19 येथे नवी मुंबई महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण क्रीडांगण संघांच्या सरावासाठी विकसित करण्यात आले आहे.
दि. 6 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वा. न्यूझिलंड आणि टर्की या दोन संघांमध्ये स्पर्धेचा पहिला सामना डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये होत असून या स्पर्धेच्या अनुषंगाने आज न्यूझिलंडच्या संघाने यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात सकाळी 9.30 व सायं. 5 वा. प्रत्येकी दोन तास सराव केला. सरावानंतर न्यूझिलंड संघाचे प्रशिक्षक यांनी मैदानाचे विशेष कौतुक केले. स्पर्धेच्या सरावासाठी फिफाच्या निकषानुसार रिएव्हरा गवताचे मैदानात आच्छादन टाकण्यात असून वाळूचा बेस वापरण्यात आला आहे. तसेच खेळाडूंसाठी चेंजींग रूम, वेटींग रूमसह प्रसाधनगृहे, स्नानगृहे व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानातील सुविधांसह प्रत्यक्ष मैदानाची सरावादरम्यान न्यूझिलंड संघाने प्रशंसा केली.