नवी मुंबई : 6 ऑक्टोबरपासून नवी मुंबईत सुरू होणा-या फिफा 17 वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन कार्यक्रम हाती घेतला असून खेळाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश प्रसारित केला जात आहे.
अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ भारत अभियांनांतर्गत झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 मध्ये देशात आठव्या व महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून मानांकीत झाले असून हे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई शहर स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 करिता सज्ज होत आहे.
म्हणूनच फिफा स्पर्धेच्या अनुषंगाने खेळातून आरोग्य व स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या अनुषंगाने स्वच्छतेतून आरोग्य हे संदेश प्रसारीत करण्यासाठी नवी मुंबईतील भावी पिढीचा अर्थात विद्यार्थी, युवकांचा सहभाग असलेली भव्यतम वॉकेथॉन 5 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत आहे.
विद्यार्थी तसेच क्रीडा व स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागाने संपन्न होणा-या या वॉकेथॉनमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 112 शाळांमधील साधारणत: 35 हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
यापूर्वी सन 2015 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या स्मार्ट व स्वच्छ नवी मुंबई वॉकेथॉन मध्ये 27 हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते व त्याची राष्ट्रीय विक्रमी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झालेली आहे. हा वॉकेथॉनचा आपलाच विक्रम यावेळी 35 हजाराहून अधिक विद्यार्थी, नागरिकांचा एकत्रित सहभाग असलेली 5 ऑक्टोबर रोजी आयोजित भव्यतम वॉकेथॉन मोडणार असून याव्दारे नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे.
से. 36, नेरुळ करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदान येथून 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता वॉकेथॉनला प्रारंभ होणार असून ही वॉकेथॉन बेलापूरच्या दिशेने महापालिका मुख्यालयापर्यंत तसेच नेरुळच्या दिशेने रामलीला मैदानापर्यंत खेळातून व स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश प्रसारीत करत जाणार आहे.
आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबईमध्ये वॉकेथॉनच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर, हरीत व क्रीडाप्रेमी नवी मुंबईचा संदेश शहराचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनमानसात रुजाविण्यात येत आहे. याठिकाणी नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन घडावे यादृष्टीने वॉकेथॉनच्या या अभिनव उपक्रमात नागरिकांनीही उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे आणि यामध्ये आपला विक्रमी सहभाग नोंदवावा तसेच शहराविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.