आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी व
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांजबरोबर एकत्रित बैठक संपन्न
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर-19 येथील नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) व ट्रक टर्मिनलसाठी दिलेल्या भूखंडास तेथील स्थानिक रहिवाशींनी गेले अनेक दिवसांपासून विरोध दर्शवित आंदोलन सुरु केले असून सदर आर.टी.ओ. कार्यालय व ट्रक पार्किंग इतरत्र हलविण्यासंदर्भात आज बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई उपप्रादेशिक अधिकारी श्री. संजय डोळे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांजबरोबर एकत्रित बैठक संपन्न झाली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या समस्येवर उचित कार्यवाही करण्याचे मान्य करीत सदर भूखंड उपलब्ध करण्याकरिता आर.टी.ओ. अधिकाऱ्यांना हवा असलेल्या भूखंडाचे सर्वेक्षण सुरु असून सदरबाबत लवकरच भूखंड उपलब्ध करून देण्याचे यावेळी स्पष्ट केले.
नेरूळ सेक्टर-19 येथे नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) करिता भूखंड उपलब्ध करण्यात आला आहे त्या भूखंडाशेजारी निवासी क्षेत्र, अनेक सोसायट्या असून तेथील लोकसंख्या सुमारे 28 हजार इतकी आहे. समोरच वंडर्स पार्क उद्यान, परिसरात 3 शाळा-कॉलेज असून वंडर्स पार्क उद्यानात येणारे पर्यटक, शाळा-कॉलेजमधील येणारे अनेक विद्यार्थी तसेच सेवारस्ता (सर्विस रोड) हा अतिशय लहान असल्यामुळे अवजड वाहनांना वाहने वळविणे अशक्य आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसताना निवासी क्षेत्रात आर.टी.ओ. कार्यालय आल्यास त्याठिकाणी नोंदणीसाठी व ट्रक पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडीसह गुन्हेगारी वाढली जाईल. त्यामुळे सदर कार्यालय निवासी क्षेत्रातून इतरत्र हलविण्याबाबत सिडको एम.डी. भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सदर आर.टी.ओ. कार्यालयाकरिता दुसरा भूखंड दिल्यास आम्हाला मान्य असल्याचे सांगितले होते. याच अनुषंगाने आर.टी.ओ. कार्यालयासाठी दुसरा भूखंड देण्यात यावा याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांजसह सिडको एम.डी. भूषण गगराणी यांची भेट घेतली.
सिडको एम.डी. भूषण गगराणी यांनी हि सकारात्मक प्रतिसाद दिला असून सदर कार्यालयासाठी भूखंडाचे सर्वेक्षण आम्ही सुरु केला असून लवकरच सदर कार्यालयासाठी भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, आज सिडकोचे एम.डी. भूषण गगराणी व नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे तसेच शशिकांत तरसे यांजबरोबर एकत्रित बैठक झाल्यामुळे सदर प्रश्न सुटण्यास मदत झाली असून सिडको एम.डी. यांनीही लवकरच भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सदर प्रश्न मार्गी लागला आहे.