ठाणे- ठाण्यातील मिसळ शौकीनांना पुढील आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध अशा चटकदार मिसळी चाखण्याची संधीलाभणार आहे. सलग तीन वर्षे पुण्यातील खाद्यप्रेमी आणि खवय्यांच्या पसंतीस उतरल्यानंतर ‘बिईंग वुमन’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्यामिसळ महोत्सवाचे आयोजन आता ठाण्यात करण्यात येत आहे. ठाण्यातील स्थानिक नगरसेवक सामंत सरांच्या प्रयत्नाने ठाण्यातील घंटाळी देवीमंदीराजवळील घंटाळी मैदानात येत्या १९, २० आणि २१ जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तीनही दिवस सकाळी आठ ते रात्रौदहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे.
नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळबनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविधमिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय दही, ताक, चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस, मोदक, खरवस, पुरणपोळी,कुल्फी, फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स या महोत्सवात खवैय्यांची रसना तृप्त करण्यास सज्ज असणार आहेत. विशेष म्हणजे मिसळीचे छायाचित्रअसलेला भला मोठ्ठा बॅकड्रॉप असलेला सेल्फी पॉईंट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. त्यामुळे तरूणाईची पावलेही या महोत्सवाकडे वळणार यातशंका नाही. बिईंग वुमन आयोजित पुण्यातील तीनही मिसळ महोत्सवांना तीस हजारांपेक्षा अधिक खवय्यांनी हजेरी लावली होती. पुण्याप्रमाणेचठाण्यातही खवय्यांची संख्या मोठी असल्याने ठाण्यातही या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल, असा आयोजकांना विश्वास आहे. तीन दिवसांतसाधारण पंधरा हजार लोक या महोत्सवाला भेट देतील असा, आयोजकांचा अंदाज आहे.