सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून ३ मीटर खोलवर आहे. परंतु नवी मुंबई शहराचा विकास करणार्या सिडकोने जुईनगर परिसरात इमारतींची निर्मिती करताना खोलगट भागाची निवड केल्याने ४०० हून अधिक रहीवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. जुईनगर सेक्टर २४ मधील आमेकार सोसायटीतील रहीवाशांनी मल:निस्सारणचा त्रास व पावसाळ्यात साचणार्या पाण्याचा त्रास याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आजवर उदासिनताच दाखविल्यामुळे येथील रहीवाशांचा मृत्यू झाल्यावरच पालिका प्रशासन उपाययोजना करणार काय, असा संतप्त प्रश्न स्थानिक रहीवाशांकडून विचारण्यात येत आहे.
जुईनगर सेक्टर २४ येथे रेल्वे फाटकाजवळ सिडकोची ओमकार सोसायटी आहे. या सोसायटीत ८० सदनिका असून ४०० पेक्षा अधिक रहीवाशी वास्तव्य करत आहेत. या सेासायटीतील इमारतीचे बांधकाम सिडकोने चुकीच्या ठिकाणी केल्यामुळे गेली १८ वर्षे रहीवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रस्त्यापासून व सपाटीपासून खोलगट भागात सिडकोने या इमारती बांधल्यामुळे सोसायटीतील मल:निस्सारण वाहिनी सदैव तुंबलेली असते. हे सांडपाणी सतत सोसायटी आवारात असते. पावसाळ्यात सभोवतालचे सर्व पाणी सोसायटीत येवून तलाव निमार्र्ण होतो. मल:निस्सारन वाहिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने सोसायटीतील रहीवाशांना जीव मुठीत घेवून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याविषयी लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन सर्वत्र पाठपुरावा करूनही सर्व स्तरावर उपेक्षा झाल्याचा संताप रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अखेरिला संतप्त रहीवाशांनी आता प्रशासनाच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
येथील सदनिकाधारकांनी आपली समस्या सर्वपक्षीय राजकारण्यांच्या तसेच पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. निवडणूका जवळ आल्यावर मतदान मागण्यासाठी सोसायटीत येणारे राजकारणी नंतर समस्या विचारण्यासाठी फिरकतही नसल्याचा संताप येथील रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. गेली २० वर्षे सिडकोच्या चुकीचा आणि पालिकेच्या उदासिनतेचा फटका सहन करत येथील रहीवाशी आणि त्यांचा परिवार नरक यातना भोगत आहे. पावसाळ्यात तर सभोवतालचे पाणी या सोसायटी आवारात जमा होवून येथे तलाव तयार होतो. बाराही महिने सांडपाण्याची डबकी असल्यामुळे रहीवाशांना साथीच्या आजाराचाही सामना करावा लागत आहे.