नवी मुंबई:- नवी मुंबई कोपरी येथील 291 घरांवरील महापालिकेमार्फत होणाऱ्या तोडक कारवाईला विरोध करीत सदर कारवाईला स्थगिती मिळावी व तेथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांची घरे नियमित व्हावीत, याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची राज्याचे नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांजबरोबर बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांसोबत नगरसेवक विलास भोईर, आठले उपस्थित होते.
नवी मुंबई कोपरी येथील 291 घरांना महानगरपालिकेमार्फत नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. सदर गावातील ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या घरांना तोडक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. काही महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशनात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवून कोपरी गावातील नागरिकांच्या मदतीला धावून आल्या होत्या. सदर घरांवर तोडक कारवाई होऊ नये, याकरिता तेथील हजारो नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते. याच अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नगरविकास गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. सदर विषयाबाबत मंत्री महोदयांनी पालिका आयुक्त व सिडकोचे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आपल्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित केली होती.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, राज्य शासनाने राज्यातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामे नियमित करणेसंदर्भात ठराव समंत केला असून मा. राज्यपाल महोदयांनी त्यास मंजुरी दिली आहे. परंतु असे असतानाही नवी मुंबईतील गाव गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या सन 2015 पूर्वीच्या घरांना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोटीसी बजावण्यात येत आहेत. नवी मुंबईतील कोपरी गावांतील सुमारे 291 घरांना नवी मुंबई महानगरपालिकेने नोटीसा पाठविल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यशासनाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामे नियमित करणेबाबतचा ठराव समंत केला असताना महापालिकेने दिलेल्या नोटिसा कशाच्या आधारावर दिल्या?त्यामुळे कोपरी येथील सदर घरांवर होणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यात येण्याची मागणी मंत्री महोदयांना करण्यात आली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
राज्याचे नगरविकास गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही सदर जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली नसल्याने महापालिकेने तोडक कारवाई करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे सदर घरांवर तोडक कारवाई न करण्याचे पालिकेला सूचित केले.
सदर बैठक संपल्यानंतर बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. भूषण गगराणी यांची निर्मल भवन येथील कार्यालयात भेट घेऊन सदर विषयाबाबत चर्चा केली असता त्यांनी सदर घरे 2015 पूर्वीची असतील तर तोडक कारवाईच्या नोटीसा देणे चुकीचे आहे असे सांगितल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त रमेश चव्हाण, सहाय्यक नगर रचना अधिकारी ओवेस मोमीन, सिडकोचे उपनियोजन अधिकारी प्रकाश सानप, विलास खडसे तसेच वाशी-कोपरी गावातील तानाजी पवार व मोरेश्वर ठाकूर उपस्थित होते.