नवी मुंबई – महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार कठोर कारवाई करण्यात येत असून बेलापूर व घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उचलण्यात आला.
यामध्ये बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत करावे मधील साईवाडी येथे चंद्रकांत कोळी यांचे तीन मजली 80.00 चौ.मी. क्षेत्रफळाचे व अराफत शेख यांचे तीन मजली 95.00 चौ.मी. क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले. या अनधिकृत बांधकामांस महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. तथापि या नोटिशीस प्रतिसाद न दिल्याने अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत 4 ब्रेकर, 3 गॅस कटर व 25 मजुरांसह पोलीस पथक कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात होते.
अशाचप्रकारे घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील अर्जुनवाडी येथे वसीम खान यांनी अनधिकृतरित्या केलेले तळमजल्याचे इमारत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई केली. या कारवाईत 2 ब्रेकर, 2 गॅस कटर अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार विविध विभाग क्षेत्रात अतिक्रमण बांधकाम विरोधी कारवाया अधिक प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.