सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाविषयी सकारात्मक चर्चा
आमदार संदीप नाईक यांनी घेतली आयुक्त रामास्वामी एन. यांची भेट
नवी मुंबई :- ऐरोलीतील नाटयगृहाचे थांबलेले काम लवकरात लवकर सुरु होवून नवी मुंबईतील नाटयप्रेमींची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आमदार संदीप नाईक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी त्यांनी या आणि नागरी सुविधांच्या अन्य महत्वाच्या विषयांवर पालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांची महापौर जयवंत सुतार आणि स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांच्यासह भेट घेतली. नाटयगृहाच्या कामासाठी लवकरच नविन निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त रामास्वामी एन. यांनी आमदार नाईक यांना दिले. त्याचबरोबर घणसोली सेंट्रलपार्क बाधित सावली गावाचे पुनर्वसन करण्यावरही सकारात्मक चर्चा याप्रसंगी झाली.
नवी मुंबईतील नाटयरसिकांची सांस्कृतिक भूक शमविण्यासाठी वाशी येथे एकमेव विष्णुदास भावे नाटयगृह आहे. मात्र ऐरोली आणि इतर नोडच्या नागरिकांना एकतर वाशीतील भावे नाटयगृहात, मुलुंडच्या कालिदास नाटयगृहात किंवा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये नाटक पाहण्यासाठी जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा देखील वाया जातो. नाटयप्रेमींची ही अडचण लक्षात घेवून आमदार नाईक यांनी ऐरोलीत नविन नाटयगृहासाठी शासन आणि सिडकोकडे पाठपुरावा करुन पालिकेला सिडकोकडून भूखंड उपलब्ध करुन दिला. या नाटयगृहाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी त्यांनी पालिकेचे आतापर्यतचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकार्यांबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्या. या नाटयगृहातील कामांसाठी आमदार नाईक यांनी स्वतःच्या आमदारनिधीमधून ३० लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे. महापालिकेनेही निधीची तरतूद केली आहे. अलिकडेच आमदार नाईक यांनी नाटयगृहाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती. मात्र नाटयगृहाचे काम थांबलेलेच आहे. ऐरोली नाटयगृहाचे काम लवकरात-लवकर पुन्हा सुरु करुन ते ठराविक वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी आयुक्तांकडे केली. त्याचबरोबर या नाटयगृहात प्रादेशिक चित्रपट दाखविण्याची सुविधा असावी, नाटयगृहात कलाकारांच्या वापरासाठी बहुउददेशिय सुविधा असाव्यात. वाद्यवादन, संगीत, नाटय प्रशिक्षण, सांस्कृतिक तसेच कलाविषयक शिकवण्या, नाटयस्पर्धा अशा कारणांसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि तालमीसाठी स्वतंत्र विभाग राखून ठेवावा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या. आमदार नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे नाटयगृहाच्या कामाला गती देण्यासाठी लवकरच नविन निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
शहरात नागरी सुविधांची अनेक कामे सुरु आहेत. त्या कामांची गुणवत्ता राखून ती वेळेत पूर्ण करावीत. ऐरोली, कोपरखैरणे आणि इतर नोडमध्ये स्कायवॉकची मागणी जुनी आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात नमूद अनेक कामे होत नाहीत. ती का होत नाहीत? ही कामे व्हावीत, अशी लोकप्रतिनिधींची मागणी असते. या कामांमधील अडथळे दूर करुन ती कामे मार्गी लावण्यासंबंधी आमदार नाईक यांची आयुक्तांसमवेत चर्चा झाली.
पालिकेच्या रुग्णालयांसाठी अलिकडेच उपचाराची नविन वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. ही उपकरणे लवकरात लवकर बसवून दिरंगाई न करता त्यांचा लाभ जनतेला द्यावा, पावसाळापूर्व कामे अगदी पावसाळयाच्या उंबरठयावर हाती न घेता अगोदरच सुरु करुन ती एप्रिल-मे पर्यत संपविण्याचे नियोजन करावे, अशा उपयुक्त सूचना देखील आमदार नाईक यांनी या बैठकीत केल्या.