भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा विराट महामेळाव्यात कार्यकर्त्यांना संदेश
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे काम घराघरात जाऊन सांगा आणि २०१९ च्या निवडणुकीत केंद्रात व महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमतासह एनडीएचे सरकार स्थापन करा, असा संदेश भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी दिला.
भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानावर आयोजित केलेल्या पक्षाच्या पाच लाख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक विराट महामेळाव्यात अमित शाह बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, पियूष गोयल, हंसराज अहीर व सुभाष भामरे, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खा. पुनम महाजन, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे तसेच प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. पुरामध्ये जीव वाचविण्यासाठी एकमेकाचे विरोधी प्राणीही एखाद्या झाडावर एकत्र येतात तसेच मोदीजींच्या लोकप्रियतेच्या पुरातून वाचण्यासाठी विरोधी विचारांचे पक्षही एकत्र येऊन निवडणूक लढू पाहतात. पण जगातील सर्वात लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपाकडे असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच निवडणूक जिंकेल. ही निवडणूक मोदी सरकारने केलेले काम आणि भाजपाचे बूथ पातळीपर्यंतचे संघटन याच्या जोरावर जिंकायची आहे. २०२२ पर्यंत नवा भारत घडविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
मोदीजींना साडेचार वर्षांचा हिशेब मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना मा. अमित शाह म्हणाले की, मोदीजींना हा हिशेब मागण्यापूर्वी काँग्रेसला जनता गेल्या चार पिढ्यांचा हिशेब मागत आहे. गरिबांना गॅस कनेक्शन, शौचालय, वीज पुरवठा, आरोग्य कवच देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. हे काम काँग्रेसला करता आले नाही.
भाजपाबद्दल अफवा पसरविण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले की, भाजपा अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण कधीही रद्द करणार नाही व कोणाला तसे करू देणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या महामेळाव्यात पक्षाचे विराट रूप दिसते. यामध्ये सर्व जाती धर्मांचे कार्यकर्ते आहेत. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यातच देशाला चांगले भवितव्य आहे. त्यामुळे सत्तेसाठी लांडग्यासारखे हपापलेले विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचाच झेंडा फडकणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नौटंकीला जनता भुलणार नाही.
त्यांनी सांगितले की, राज्यात परिवर्तन घडवले आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे क्रांती सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात समृद्धी येत आहे. पण ज्यांच्या तिजोरीत शेतकऱ्यांचा पैसा गेला तेच हल्लाबोल नव्हे तर डल्लामार यात्रा काढत आहेत. आगामी काळ महत्त्वाचा आहे. दीनदलित ओबीसींमध्ये पक्षाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. विरोधक बुद्धीभेद करून समाजात तेढ निर्माण करतील पण पक्षाच्या कार्यकर्त्यात जनतेत जाऊन संवाद साधला तर बदनामीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अंत्योदयाची प्रेरणा घेऊन गाव, गरीब व किसानांच्या कल्याणाचे काम केले आहे. वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, जनधन योजना अशा गरिबांसाठीच्या योजना यशस्वीपणे राबवताना सरकारने कधी जात धर्माचा भेदभाव केला नाही. केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीमुळे राज्य बदलत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यात सिंचनाचे प्रमाण चाळीस टक्क्यांवर नेऊ.
ते म्हणाले की, काँग्रेसला पन्नास वर्षात जे काम करता आले नाही ते भाजपाच्या सरकारने पाच वर्षांपेक्षा कमी काळात करून दाखवले. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते आहे. त्यातून जातीयवाद, सांप्रदायिकता भडकावणे चालू आहे. पण देशाचा विकास करायचा असेल आणि गरिबांचे भविष्य बदलायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही.
भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आपल्या सरकारप्रमाणेच गतीने काम करतो आहे. या मेळाव्यात पक्षाचे विराट रुप पाहिल्यानंतर गावागावात पक्षाचे काम करताना ध्यानात ठेवा की हा विशाल पक्ष आपल्या पाठीशी आहे. २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही पुन्हा यश मिळवायचे आहे.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भाषणे झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश सरचिटणीस आ. अतुल भातखळकर यांनी सूत्रसंचालन केले. भाजपाच्या पाक्षिक मनोगतच्या विशेषांकाचे यावेळी मा. अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.