नवी मुंबई :- आधुनिक शहराप्रमाणेच ग्रीन सिटी, इको सिटी ही नवी मुंबईची ओळख दृढ करण्यासाठी विविध सुविधा कामे, प्रकल्प यामधून शहराच्या पर्यावरणशीलतेकडे लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये जैव विविधता जपण्याचा प्रयत्न केला जात असून शहरातील प्राणी, पक्षी यांच्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पशुपक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी ही अडचण दूर करण्यास सकारात्मक दृष्टीकोन दाखवीत जुईनगर, नेरुळ विभागात पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव महानगरपालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पाठविला आहे.
याबाबत नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही सातत्याने मागणी होत होती. नेरुळ विभागातील जुईनगर से. 24 मधील भूखंड क्र. 5 व 6 येथे पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याकरीता सिडकोकडून 920.774 चौ.मी. एवढे क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेला आहे. या भूखंडावर पशुपक्षी यांची चिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत स्वरुपाचे पशुवैद्यकिय रुग्णालय महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे.
या दोन मजली पशुवैद्यकीय रुग्णालय इमारतीत 11 हजार चौ.फुटाचे आर.सी.सी. बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी साधारणत: रु.5 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर लहान / मोठ्या प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया व तपासणी कक्ष, स्टेरलायजेशन रुम, चेंजींग व प्रिपेरेशन रुम, डॉक्टर रुम, प्रतिक्षा कक्ष, कुत्र्यांकरीता दोन स्वतंत्र विभाग, पक्षांकरीता कक्ष तसेच दुस-या मजल्यावर ऑफिस व मिटींग रुम, पेन्ट्री, रेकॉर्ड रुम, लॉन्ड्री व स्टोअर रुम, औषध वाटप कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, कर्मचारी विश्रांती कक्ष तसेच प्रत्येक मजल्यावर स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे व्यवस्था तसेच प्राण्यांकरिता व नागरिकांकरिता स्वतंत्र उद्वाहक (लिफ्ट) व्यवस्था असणार आहे.
या पशुवैद्यकिय रुग्णालयामुळे पशुपक्षांच्याही आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पशुपक्षांवर चांगले उपचार व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका पशुवैद्यकिय रुग्णालय उभारत आहे.