मुंबई – महापालिका पोटनिवडणुकीत सायनमधील प्रभाग क्रमांक १७३ चा आपला गड कायम राखण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे ६११६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुनील शेट्ये यांचा पराभव केला.
नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. प्रभाग क्रमांक १७३ मधून शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने मूळचे शिवसैनिक असलेले सुनील शेट्ये यांना उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. पण अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे.
या निवडणुकीत दिवंगत नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण शिवसेनेने ठोंबरे यांची समजूत काढून त्यांना उमेवादी मागे घेण्यासाठी राजी केले. त्यानंतर शिवसेनेला भाजपाची साथ मिळाली. खरंतर शिवसेना आणि भाजपा परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण या पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेला मदत करुन रामदास कांबळे यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर केला.
भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार दिला नव्हता. भाजपाने या पोटनिवडणुकीत उमेदवार न देता त्याच मदतीची परतफेड केली. काल मुंबईत झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यातही भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले होते. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीपर्व सुरु होईल अशी चर्चा आहे.