पनवेल :- महापालिकेच्या सभेत आतापर्यंत 118 ठराव संमत करण्यात आलेले आहेत. त्यापैंकी 48 ठरावांची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आलेली आहे. 56 ठरावांबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, 14-15 ठराव बेकायदेशिर घेण्यात आलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती देत त्या ठरावांची अंमलबजावणी आपण मुळीच करणार नाही, असा निर्धार महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सामाजिक संस्थांच्या शिष्टमंडळासमोर व्यक्त केला.
महापालिका आयुक्त पनवेलच्या विकासाला बाधक ठरत असल्याचा आरोप सत्ताधारी आणि त्यांच्या अंधभक्तांकडून सातत्याने होत असल्याने सत्यस्थिती समाजासमोर यावी, या हेतून विकास कामांची सद्यःस्थिती आणि महापालिकेच्या निर्णयांची अंमलबजावणी यासंदर्भात आयुक्तांकडून माहिती जाणून घेण्यासाठी आज, शनिवारी (दि. 07) सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
****************
पाणी नियोजनाचा उडविला फज्जा
पनवेलला सतावणार्या पाणी प्रश्नाला लोकप्रतिनिधी कसे जबाबदार आहेत, त्याविषयी त्यांनी माहिती देताना सांगितले की, आपण एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले होते. परंतु, तो निर्णय मागे घेण्यास सांगून आपण नवी मुंबईकडून पाणी आणू असे पत्रकार परिषद घेवून माहिती देणार्यांनी नंतर मला भेटून तुम्ही आता नियोजन करा, अशी नांगी टाकत त्यांची हतबलता व्यक्त केली. मात्र, पाणी तोपर्यंत दिल्याने नियोजनात अडसर निर्माण झाला आहे. तरीही आपण आता सगळीकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सिडकोच्या दबावाला बळी पडणार नाही
सिडको केवळ कचर्यावरून आपल्याला लक्ष्य करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुुविधांबाबत अध्यादेश काढूनही सिडको हात वर करत आहे. त्यांना फक्त नफा हवा आहे, सुविधा देण्यास ते असमर्थ असून आपल्यावर बंदूक लावल्यागत दबाब टाकत आहेत. त्यांच्या दबावाला आपण बळी न पडता प्रत्यक क्षण आणि विचार केवळ पनवेल महापालिकेचा करणार असल्याची कृतज्ञता डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.
***
माझे बॉस सहाव्या मजल्यावर
मंत्रालयात सहाव्या मजल्यावर माझे ‘बॉस’ बसतात. मी त्यांच्या आदेशानुसार चालतो. त्यामुळे माझ्यावर कुणीही ‘बॉसगिरी’ करण्याचा प्रयत्न करू नये, असे नामोल्लेख टाळत त्यांनी अतिशय शेलक्या शब्दात भाजपा सत्ताधारी आणि त्यांच्या नेतृत्वावर टिकास्त्र सोडले.
आयुक्तपदाचे काम आपल्यासाठी किरकोलच!
आपण आतापर्यतच्या बारा वर्षाच्या प्रशासकीय सेवेत इडी, इनकम् टॅक्समध्ये इन्वेस्टिंग ऑफिसर, तसेच महत्वाच्या जबाबदार्या यशस्वीरित्या पेळल्या आहेत. त्यामुळे आयुक्तपदाची जबाबदारी त्यामानाने फार किरकोल आहे. पनवेलकरांसाठी माझ्या सेवेचा फायदा करून देताना महापालिकेचा एक छदामही वाया जाऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
****
आयुक्त हटाव ही एकमेव समस्या?
महापालिका आयुक्त हटाव ही काय एकमेव समस्या आहे का? असा सवाल उपस्थित करून कुणाचा इगो दुखावत असेल तर त्याला मी काय करणार? माझ्या प्रशासकीय अधिकारांचा वापर करून जनहिताचे निर्णय घेत असल्याने अनेकांना पोटशुळ उठला आहे. मी कुणाच्याही दबावापुढे न झुकता केवळ सरकारचा प्रतिनिधी म्हणून पारदर्शकतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
***
चार प्रकल्प लवकरच कार्यान्वित
150 वर्षाच्या नगर पालिकेत गेल्या 25 वर्षात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे खापर एका वर्षात माझ्यावर फोडताना ज्यांनी ज्यांनी सत्तेची फळे चाखली, त्यांनी ते नियोजन का केले नाही. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही की, ती फिरवून लगेत परिवर्तन करेन. एक मात्र, खरे की, पुढील काळात पनवेल महापालिकेचा नियोजनबद्ध विकास झालेला तुम्हाला दिसेल.
त्यामध्ये वाहनतळ, सोसायट्यांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न, इमारती तोडून निर्माण होणार्या मालावर प्रक्रिया करणारा प्रकल्प, तीन शाळांचे एकत्रिकरण करून शैक्षणिक हब, बंदिस्त गटारे, नाले आदी प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण निश्चित ठरले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
15 जून पर्यंत रस्त्यांची डागडूजी
येत्या 15 जूनपर्यंत रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल. सर्वत्र कामे सुरू आहेत. काही रस्त्यांच्या कामांच्या निविदा स्वीकारण्यास कुणी पुढे आले नसले, तरी त्यातूनही मार्ग काढण्यात येईल. पाणी, कचरा, रस्ते आणि समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.
******************
सिडकोचे धाबे दणाणले आहेत
सिडको महामंडळ सर्वांवर दादागिरी करून त्यांना झुकवत आहे. आपण त्यांच्या पदराखालचे नाही आहोत. माझे अधिकार आणि कर्तव्याची जाणीव आहे. सिडकोने मालमत्ता कर घ्यायचा आणि कचरा आमच्या माथी मारायचा, हे कदापि सहन करणार नाही. मालमत्ता हस्तांतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सिडकोने पायाभूत सुविधा पुरवायची जबाबदारी त्यांची असल्याचे सरकारने धोरण जाहिर केल्यानंतर ते कर्तव्यापासून कसे दूर जाणार?
*************************
व्यवस्थापकिय संचालकांवर गुन्हा का दाखल करू नये?
पाले येथील डम्पिंग ग्राऊंडच्या गंभीर विषय छेडताना सिडकोने केलेल्या चुका त्यांच्या अंगलट आल्या आहेत. त्यामुळे ते कचर्याचा प्रश्न महापालिकेकडे ढकळत आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांवर त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराच दिला असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
**************
अहिल्याबाई होळकरांचे रक्त
आपण अहिल्याबाई होळकरांचे वंशज आहोत. त्यांच्या पारदर्शक कारभाराची राष्ट्राला ओळख आहे. त्यांचे लोकहितासाठीचे योगदानही सर्वांना ठावूक आहे. त्यामुळे ते रक्त पनवेलकरांच्या हिताचा निश्चित विचार करणार आहे. कुणीही आपल्यावर गुरगुरण्याचा प्रयत्न करू नये, इशा गर्भित इशारा त्यांनी ठाकूरशाहीला ठोकपणे दिला.
***************
वीस पानी अहवाल संकेतस्थळावर
आयुक्त म्हणून आजच्या घडीपर्यंत केलेल्या कामांचा अहवाल काल रात्री उशिरापर्यंत तयार करून तो वीस पानी अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकला आहे. पनवेल महापालिकेच्या जनतेला आपण काय काम केले आहे, याची सविस्तर माहिती त्यातून मिळणार आहे. सामान्य जनतेने तो अहवाल वाचावा असेही ते म्हणाले.
***************
लोकप्रतिनिधींना कचर्यात ‘रस’
नगर परिषदेच्या कार्यकाळात 35 ते 45 लाखापर्यंतच कचर्याचे बिल काढले जात होते. ती बिले बोगस बनविली जात होती, असा गौप्यस्फोट करत त्या ठेकेदाराचे बिंग फोडून त्याच्यावर कारवाई केल्याने ज्यांचे हितसंबंध त्यात गुंतले होते, त्यांनी ‘कावकाव’ केली. मात्र, आज तेच बिल फक्त 19 लाख रूपयांपर्यंत होते. आपण भ्रष्टाचार करण्यापासून रोखल्याने महापालिकेच्या तिजोरीचे रक्षण होत आहे. हाच काहींच्या वर्मांवर घाव बसल्याने त्यांनी आपल्याविरोधात मोहिम उघडल्याचा आरोप केला.
शिष्टमंडळात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, अरुण भिसे (सिटीझन्स युनिटी फोरम), रंजना सडोलीकर (कफ, कामोठे), शोभा गावंड (एनपीईआरसी), कॅप्टन एपीएस टलावत (न्यू पनवेल रेसिडेन्सी सिव्हिक फोरम), रवी श्रीवास्तव (खारघर हाऊसिंग फेडरेशन), डॉ. अविनाश वाळींजकर (खारघर हाऊसिंग फेडरेशन), उमेश गायकवाड (एकता सामाजिक संस्था), रामदास नारकर (आई फाऊंडेशन, खारघर), संतोष चिखलकर, सचिन गायकवाड, अमोल शितोळे (एकता सामाजिक संघ), मनिष कुळे (आई फाऊंडेशन), बळेखर अ. मुल्ला (खारघर हाऊसिंग फेडरेशन), अमिता चौहान (नारी शक्ती जागृती फाऊंडेशन), किर्ती मेहरा (इश फाऊंडेशन, खारघर), चंद्रकांत शिर्के, मंगल भरवाड, (संघर्ष समिती पनवेल), प्रा. अनुराज ठोकूरवाले (शिवप्रेमी रिक्षा मंडळ), सुनील सावर्डेकर (आई फाऊंडेशन), मुदस्सर पटेल, रमेश चव्हाण (कफ आणि जनजागृती ग्राहक मंच), माऊली तांगडे (कळंबोली), मनोहर लिमये (कफ पनवेल), प्रशांत पटील (यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट), महेश पवार (प्रबल चॅरिटेबल ट्रस्ट), रॉझिन रफाया, शिवाजी मोरे (साईसज्ज पॅराडद्विन असोशिएशन साईनगर), रामकिशोर उप्पोनी (साईनगर), दीपक सिंग (कळंबोली), संतोे मोकल (श्री राम सामाजिक विकास मंडळ कळंबोली), कमांडर एस. एच कलावत (जनरल सेक्रेटरी खारघर फेडरेशन), यशोदा गायकवाड (शिवसेना एसएसएमव्हीएस संस्था), सहिता नाईक (खारघर फेडरेशन), बुद्धभुषण गायकवाड (युवासेना, अधिकारी), अमित साबळे (कफ पनवेल), शाहनवाझ मुल्ला (पनवेल), मंदार दोंडे (पनवेल), आत्माराम कदम, मनोज पाटील, ऍड. संध्या पाटील, राजकुमार ताकमोगे (हास्य क्लब), प्रकाश चांदिवडे (मसे संघ), वचन गायकवाड (पंचशील सामाजिक संस्था व वाचनालय), सागर पाटील (रायझिंग हार्ट मित्र मंडळ, कामोठे), संजय पडवल, दिलीप पवार, ज्योती नादकरी (केटीएस वेल्फेअर असोसिएशन), अण्णा वावरे (कळंबोली), राजकुमार ताकमोगे (कफनगर), वैभव सोनटक्के (खारघर), नामदेव मोकल (कळंबोली), संथाजी जावीर (कळंबोली) आदींचा समावेश होता.