नवी मुंबई :- पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष व जागतिक आरोग्य दिनानिमित्त नवी मुंबई भारतीय जनता पार्टी, हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटल, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन, पतंजली स्टोर सीबीडी व इम्पाथी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी सेक्टर-9 ए, मिनीसिशोर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिराचे उदघाटन बेलापूरच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे याच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. सदर महाआरोग्य शिबिरामध्ये सामान्य वैद्यकीय तपासणी,मधुमेह, दमा, रक्तदाब, बी.एम.आय., फुफ्फुसांचे आजार, हाडांच्या रोगांची तपासणी,ई.सी.जी.,नेत्र चिकित्सा इत्यादी आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या.
वाशी सेक्टर-9ए येथील मिनीसिशोर येथे नवी मुंबईतील अनेक जेष्ठ नागरिक, महिला वर्ग सकाळी मॉर्निंग वॉक करिता येत असतात. जेष्ठ नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याकरिता डॉक्टरांचा सल्ला, मधुमेह, रक्तदाब सारख्या तपासण्या, डोळ्यांच्या तपासण्या यांसारख्या सामान्य तपासण्या सतत कराव्या लागतात. याच अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर महाआरोग्य शिबिरात सकाळी मॉर्निंग वॉक करिता आलेल्या तब्बल 573 जेष्ठ नागरिक व महिलांनी लाभ घेतला असून 271 जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असून अशा आरोग्य शिबिराची जेष्ठ नागरिकांना गरज आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. गेले 4 वर्षे माझ्या माध्यमातून अनेक ठिकाणी असे महाआरोग्य शिबिरे आम्ही आयोजित केली असून अशा शिबिरामधून हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. वाशी मिनीसिशोर येथे नवी मुंबईतील विविध क्षेत्रातून शेकडो जेष्ठ नागरिक व महिला सकाळी मॉर्निंग वॉक करिता येत असतात. त्यांच्याकरिता आरोग्य शिबीर आयोजित करून शिबिरातील सर्व तपासण्या मोफत करण्यात येऊन जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आल्याने जेष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच सीबीडी सेक्टर-15 पतंजली स्टोर मार्फत जेष्ठ नागरिकांना टूथब्रश, साबण यांसारखे पतंजलीचे सामानही मोफत वाटण्यात आले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी अब्दुल हमीद खान (पाशाभाई), विकास सोरटे, प्रताप मुदलीयार, प्रमिला खडसे, देवेंद्र खडसे, गुणाबाई सुतार, हरिश्चंद्र सुतार, महेश दरेकर, संतोष पळसकर उपस्थित होते.