नवी मुंबई :- महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात परवाना विभागामार्फत विना परवाना व्यवसाय करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बेलापूर, वाशी, ऐरोली व तुर्भे विभागातील 26 विना परवाना उपहारगृहे व सलून यांच्यावर विभाग कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली.
यामध्ये बेलापूर विभागातील मे. तारा हॉस्पिटॅलिटी (लॉजिंग), तुर्भे विभागातील मे. एस पी लॉज, सानपाडा सेक्टर-01 विभागातील मे. स्क्वेअर स्पा, व तुर्भे विभागातील मे. व्हॉयलेट बुध्दा, सत्रा प्लाझा अशा व्यवसायांचा समावेश आहे. अशाप्रकारच्या 420 विनापरवाना व्यवसायांवर आजतागायत मोहोरबंदची (Seal) कारवाई करण्यात आली आहे.
सक्तीच्या कारवाई व्यतिरिक्त नागरिकांना / व्यावसायिकांना परवाने घेण्यासाठी सुलभ व पारदर्शी पर्याय म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने विविध परवाने ऑनलाईन देण्याची सुविधा ऑक्टोबर 2016 पासून उपलब्ध करुन दिली आहे. त्या अंतर्गत अदयापपर्यंत 560 परवाने देण्यात आले आहेत. ऑनलाईन सुविधेचा वापर परवाना नुतनीकरणासाठी सुध्दा होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-2015 ला अनुसरून पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याच्या उद्देशाने 4/09/2017 रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून व्यवसाय परवाना मिळणेकामी व नुतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या अतिशय कमी करण्यात आलेली असून तशा प्रकारची अधिसूचना नवी मुंबई महानगरपालिकेने 29 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिध्द केलेली आहे.
नवीन परवाना व परवाना नुतनीकरणासाठी व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या rtsnmmconline.com या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज सादर करावेत व आपल्या व्यवसायावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. यापुढील काळात परवाना नुतनीकरण न करणा-या व्यवसायांवर व्यापक स्वरुपात कारवाई करण्यात येणार आहे.