दिपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा धरण व सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेतुन पुढील वर्षाचा पाणीपुरवठा अबाधित ठेवण्याच्या कृति योजनेंतर्गत सिडको अधिकार क्षेत्रातील पाणी पुरवठ्यात दिनांक 19 मार्च 2018 पासून 10 टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने सिडको अधिकार क्षेत्रातील (नमुंमपा क्षेत्राव्यतिरिक्त) रहिवाश्यांनी पाणी जपून वापरण्याचे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता सर्वात जास्त भासते. पाण्याच्या विनाकारण अपव्ययामुळे भविष्यात या संबंधितअनेक अडचणी येऊ शकतात. यासाठी नागरीकांनी पाण्याची बचत करणे अपेक्षित आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाणी वापरताना आपण थोडीशी काळजी घेतली तर पाण्याची मोठी बचत होऊ शकते.
आपल्या राहत्या घरातील अथवा इमारत, सोसायटीमधील नळ, नळ जोडण्यांमध्ये गळती असेल तर त्याची तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. घर अथवा इमारतीतील साठवण टाकीतील पाणी वाहत राहणार नाही याची काळजी घ्यावी. शॉवर/बाथटब यांऐवजी बादली व मग घेऊन आंघोळ करावी. घरातील लादी अथवा आपले वाहन वाहत्या पाण्याने धुण्यापेक्षा छोट्या बादलीत पाणी घेऊन कपड्याने पुसावी. पाणी कधीही शिळे होत नाही. त्यामुळे आदल्या दिवशीचे साठवलेले पाणी फेकून देऊ नये. कपडे धुतल्यानंतर उरलेल्या पाण्याचा उपयोग शौचालय अथवा वाहन धुण्यासाठी करावा. आपल्या रोजच्या सवयीत पाण्याचा पुनर्वापर, पाणी बचत, जलसंवर्धन अशा प्रकरच्या संकल्पनांचा अवलंब करा. यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून आपण नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत करू शकतो.
याशिवाय सिडको जलवाहिनीतून पाणी गळती होत असल्यास अथवा पाण्याचा कुठेही अपव्यय होत असल्याचे आढळल्यास खालील नमूद क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन नागरीकांना सिडकोमार्फत करण्यात येत आहे.
नोड | दूरध्वनी क्रमांक |
नवीन पनवेल/काळुंद्रे | 022-61173807 |
कळंबोली/नावडे | 022-27421213 |
कामोठे | 9029059751 |
खारघर/तळोजा | 9029059765 |
द्रोणागिरी/उलवे | 9029059749 |
नवी मुंबईतील पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील उपलब्ध पाणी साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवणे गरजेचे आहे. सर्वांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. यासोबतच सर्व जनतेने पाण्याचा जपून वापर करून सर्वांनी एकजुटीने एकमेकांना व प्रशासनास सहकार्य करावे अशी सिडकोतर्फे सर्व नागरीकांना विनंती करण्यात येत आहे.