नवी मुंबई :- विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे व विद्यार्थीही हायटेक व्हावे, याकरिता वाशी येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे आमदार निधीमधून दिलेल्या 5कम्प्युटर व 2 प्रिंटरचे वाटप व उदघाटन समारंभ नुकताच बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी भाजपा नवी मुंबई उपाध्यक्ष संपत शेवाळे, श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा संस्थेचे अध्यक्ष श्री. एच.एस.चढ्ढा, उपाध्यक्ष अमरीक सिंग, सचिव जसपाल सिंग, तेजिंदर सिंग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी गुरुद्वारामध्ये संगणकीय शिक्षणाचे वर्ग सुरु करणेकरिता श्री गुरुसिंग गुरुद्वारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजकडे संगणके पुरविण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता माझ्या आमदार निधीमधून आपल्या गुरुद्वाराला संगणके देण्यात येण्याचे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सदर वाशी गुरुद्वारामध्ये त्यांच्या आमदार निधीतून 5 संगणके व 2 प्रिंटर वाटप करण्यात आले.
यावेळी श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री. एच.एस.चढ्ढा यांनी सांगितले कि, आमदार मंदाताई म्हात्रे या कार्यसम्राट आमदार असून त्यांचे काम मी अनेक वर्षापासून पाहत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे पूर्ण झालेली आम्ही पाहिलेली आहेत. आम्ही त्यांच्याकडे गुरुद्वारातील मुलांना संगणक शिक्षण मिळावे तसेच गुरुद्वारामध्ये कॉम्प्युटरचे वर्ग सुरु करण्याकरिता आम्हाला फक्त कम्प्युटर हवे असल्याचे सांगितले होते. त्यांनी त्वरित आपल्या गुरुद्वारामध्ये कम्प्युटर उपलब्ध केले जातील असे सांगितले होते. आज आमच्या श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारेला 5 कम्प्युटर व 2 प्रिंटर दिल्याबद्दल श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारातर्फे आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले. कम्प्युटरचे अनेक विविध कोर्सकरिता बाहेर भरमसाठ फी आकारली जाते. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कम्प्युटर व प्रिंटर उपलब्ध केल्याने हे सर्व कोर्स गुरुद्वारातील मुलांना मोफत शिकविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, वाशी येथील श्री गुरुसिंग गुरुद्वारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे संगणके पुरविण्याची मागणी केली होती. कम्प्युटरचे अनेक विविध कोर्सकरिता बाहेर भरमसाठ फी आकारली जात असल्याने गुरुद्वारातील अनेक मुले हुशार असूनही कम्प्युटर शिक्षणापासून वंचित राहत होते. विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, गुरुद्वारातील मुलेही हायटेक व्हावे याकरिता त्यांना संगणक व प्रिंटर वाटप करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे कम्प्युटर शिक्षण घेणारी मुले उद्योगपती, डॉक्टर, वकील यांसारख्या विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करतील असा माझा विश्वास असून त्याकरिता असणारे अनेक कोर्सेसही त्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.