महापौर केवळ नामधारी असल्याची नवी मुंबईकरांमध्ये चर्चा सुरू
दीपक देशमुख
नवी मुंबई :- शिरवणे गावचे सुपुत्र व महापालिका कायद्याचा खडा न् खडा माहिती असणार्या जयवंत सुतारांची नवी मुंबई शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांनी नवी मुंबईच्या महापौरपदी वर्णी लावली. त्यावेळी खमक्या राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या जयवंत सुतार मुजोर पालिका प्रशासनाला वठणीवर आणतील, अशी अटकळ सर्वसामान्य नवी मुंबईकरांकडून वर्तविण्यात येत होती. परंतु महापौर जयवंत सुतारांच्या आदेशाकडे महापालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याने महापौर जयवंत सुतार केवळ नामधारी आहेत काय, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
पालिका आयुक्तांनी स्वच्छता सर्वेक्षणाअर्ंतगत शहराचा सर्व्हे करताना केवळ कॉलनी भागाला प्राधान्य दिले. गावठाण भागाकडे पालिका आयुक्तांनी पाठ फिरविली. यामुळे नाराज झालेल्या महापौर जयवंत सुतारांनी गावठाण भागाचा दौरा करत स्वच्छता सर्वेक्षणाचा आढावा घेण्यास सुरूवात केली. ग्रामस्थांना दिलासा मिळाला. मुळ भूमीपुत्र असलेल्या जयवंत सुतारांमुळे गावठाणातील समस्या मार्गी लागतील असा भोळाभाबडा आशावाद ग्रामस्थांकडून व्यक्त केला जावू लागला. परंतु स्वच्छता सर्वेक्षणामध्ये महापौरांनी दिलेल्या आदेशाची पालिका प्रशासनाकडून अंमलबजावणी झालीच नसल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. दोन महिन्यापूर्वी बेलापुर विधानसभा मतदारसंघातील सारसोळे गावाचा दौरा महापौर जयवंत सुतारांनी केला. यावेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष – नगरसेवक सुरज पाटील यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सारसोळे महापालिका शाळेजवळ अतिक्रमण कारवाईत पडलेले डेब्रिज तसेच पडून असल्याने महापौर जयवंत सुतारांनी नाराजी व्यक्त केली. डेब्रिजमुळे धुराळा यातून शालेय मुलांना झालेल्या श्वसनाच्या तक्रारी स्थानिक रहीवाशांनी केेल्या. डेब्रिजच्या ढिगार्यामुळे परिसराला बकालपणाही आलेला आहे. महापौर जयवंत सुतारांनी तात्काळ हे बांधकामाचे डेब्रिज हटविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. परंतु पालिका शाळेजवळ आजही हे बांधकामाचे डेब्रिज तसेच पडलेले आहे. त्यामुळे महापौरांनी दिलेले आदेश पालिका प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र नेरूळ नोडमध्ये निर्माण झाले आहे.
जुईनगर रेल्वे स्टेशनजवळील नाल्यात होत असलेल्या नालेसफाईबाबतही महापौरांच्या आदेशाचे काय झाले याचीही जुईनगर परिसरात चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यापासून जुईनगर रेल्वे स्टेशनजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. नाल्यात मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत ‘जय महाराष्ट्र’, ‘आपलं शहरं’ आदींना प्रतिक्रिया देताना नाल्यातील रेती उपशावर कारवाई करून तात्काळ थांबविली जाईल असे महापौर जयवंत सुतारांनी सांगितले होते. महापौरांचे कडवट समर्थक असलेल्या प्रभाग समिती सदस्य असलेल्या स्थानिक रहीवाशांना पालिका पदाधिकार्यांना व अधिकार्यांचा नाला परिसरात दौरा आयोजित करून रेती उपशाची समस्या संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली. या दौर्याची सोशल मिडीयावर जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणावर संबंधित ब प्रभाग समिती सदस्यांनी केली होती.
शिरवणे, जुईनगर, सारसोळे, नेरूळ ही महापौर जयवंत सुतारांची कर्मभूमी. याच ठिकाणी महापौर जयवंत सुतारांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असतील, तर उर्वरित नवी मुंबईत पालिका प्रशासन महापौरांचे आदेश किती गांभीर्याने पाळत असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी पालिका प्रशासन करत नसेल तर महापौरांच्या दौर्यांचे फलित काय असा प्रश्न नवी मुंबईकरांकडून विचारला जावू लागला आहे.