घाटकोपर मध्ये ग्रामस्थांच्या सभेत आमदार भरत गोगावलेंचा दावा
निलेश मोरे
मुंबई :- पोलादपूर तालुक्यातील रस्ते , ब्रिज , सभामंडपे , पायवाटा , ग्रामसडक , बोअरवेल आणि नुकताच शासनाकडून प्राप्त झालेला कामथे नदीवरील बंधारा शिवसेनेनेच केला असल्याचा दावा रविवार, 15 एप्रिल रोजी घाटकोपर पश्चिम इंदिरानगर सभागृहात घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या सभेत पोलादपूर , महाड , माणगाव तालुक्याचे आमदार भरत गोगावले यांनी केला .
या सभेला उपविभाग प्रमुख सुभाष पवार , जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे , पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख संजय कदम , तालुका प्रमुख निलेश अहिरे , सरपंच सुरेंद्र बांदल उपस्थित होते . शिवसेनेने पोलादपूर तालुक्यात केलेल्या विकास कामांची आढावा बैठक घाटकोपर मध्ये घेण्यात आली . या बैठकीला पोलादपूर , महाड , माणगाव तालुक्यासह मुंबईतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . में 2018 मध्ये पोलादपूर , कापडे मध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत . ग्रामपंचायत निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून शिवसेनेच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते . सेनेने केलेल्या कामांची ग्रामस्थांना माहिती मिळावी यासाठी ही सभा घेण्यात आली . यावेळी या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार भरत गोगावले उपस्थित होते . गेल्या दहा वर्षात आमदार निधीतून पोलापूर तालुक्यात झालेली विकास कामे यांची माहिती गोगावले यांनी ग्रामस्थांना दिली . शिवसेना केलेल्या कामाचे श्रेय घेते . दुसर्याने केलेल्या कामावर बोट दाखवणे हे शिवसेना करत नाही . तालुक्याचा 95 टक्के विकास शिवसेनेनेच केला असल्याचा दावा देखील भरत गोगावले यांनी सभेत केला . अंतर्गत गावात रस्त्यावर डाबर टाकून त्यांचे होर्डिंग लावून काही पक्ष कामे आम्हीच केल्याचा दावा करतात . पण त्यांच्या भूलथापांना ग्रामस्थ बळी पडणार नाही . ग्रामस्थांनो येणाऱ्या ग्रामपंचायत निवडुकीत सज्ज रहा . पोलादपूर मध्ये होणाऱ्या 7 ग्रामपंचायतीवर शिवसेनेनेचाच भगवा फडकणार आहे असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी सभेत दिला .