नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शाळेतील सभागृहाला प्रशासकीय अधिकारी स्व. सुनिल सोनी यांचे नामकरण करण्याचा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय हा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारा असून यामुळे अधिकारी समाजासाठी अधिक चांगले काम करतील असा विश्वास व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी स्व. सुनिल सोनी यांच्या आठवणीना उजाळा दिला. अशाप्रकारे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी उचललेले हे पाऊल प्रशंसा करण्यासारखे आहे असे ते म्हणाले.
अत्यंत कार्यक्षम व जनतेला लाभदायक असे काम स्व. सुनिल सोनी यांनी केंद्रात व राज्यात,ज्या ज्या विभागात काम केले तेथे केले असल्याचे सांगत श्री. सुमित मल्लिक यांनी अतिशय कडक, शिस्तप्रिय व हाती घेतलेल्या कामात रात्रंदिवस वाहून घेऊन काम करणारे अधिकारी अशी स्व. सुनिलसोनी यांची प्रतिमा अधोरेखित केली. नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यभार पाहिलेले अनेक सनदी अधिकारी इथे चांगले काम करायला वाव मिळतो असे महानगरपालिकेचे कौतुक करतात असे स्पष्ट करीत त्यांनी नवी मुंबईने स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षी केलेले काम बघून देशात पहिल्या पाचात नवी मुंबई शहर नक्की असेल असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण क्षेत्रातही अतिशय चांगले काम करीत असून आवश्यक शिक्षकांच्या पुर्ततेसाठी आपण आढावा घेऊ असेते म्हणाले. नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमान शहर म्हणून नवी मुंबईने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंबेडकरनगर, रबाले येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या सभागृहास नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त स्व. सुनिल सोनी असे नामकरण, सभागृहाचे वातानुकुलित नुतनीकरण व लोकार्पण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. या वेळी व्यासपीठावर नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे,महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. मोनिका पाटील, जी प्रभाग समिती अध्यक्ष श्री.संजू वाडे, आरोग्य समिती सभापती श्रीम.उषा भोईर, नगरसेवक श्री. सुधाकर सोनवणे, श्री. अविनाश लाड, श्री. अनंत सुतार, श्रीम. रंजना सोनवणे, श्रीम. शशिकला पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण,शहर अभियंता श्री. मोहन डगावकर, पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, कोकण विभाग उपायुक्त श्री. अभंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ स्व. सुनिल सोनी यांच्या अर्धाकृती शिल्पाचेही अनावरण करण्यात आले.
स्व. सुनिल सोनी यांच्या आयुक्तपदाच्या कालावधीत महानगरपालिकेनेमोरबे धरण विकत घेण्यासारखा महत्वाकांक्षी निर्णय घेतला गेला, तसेच आजच्या मुख्यालय इमारतीसारख्या अनेक दूरदर्शी प्रकल्पांचा पाया रचला गेला असल्याचे सांगत महापौर श्री. जयवंत सुतार यांनीआपल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या त्या काळातील त्यांच्या सोबतच्या आठवणी सांगितल्या. स्व. सुनिल सोनी यांनी प्रशासकीय शिस्त आणण्याचे काम केले असून जनतेला आवश्यक अशा सुविधांची पूर्तता ते प्राधान्याने करत असे स्पष्ट करीत शिरवणे – जुईनगरला जोडणाऱ्या अंडर पास रुंदीकरणाच्या कामाचे त्यांनी उदाहरण दिले.
आमदार श्री. संदीप नाईक यांनी स्व. सुनिल सोनी यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळानंतर जरी मी नगरसेवक झालो असलो तरी ते आयुक्त म्हणून करीत असलेल्या लक्षवेधी कामाचा प्रभाव माझ्यावर तरुणपणापासून होता असे सांगत जनतेचे हित लक्षात घेऊन त्यांनी जे लोकहिताय निर्णय घेतले त्याचा आदरपूर्वक सन्मान या सभागृह नामकरणातून होत असल्याचे स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात स्व. सुनिल सोनी यांच्यासारख्या एका उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव सभागृहाला देण्याचा हा देशातला एक आगळा वेगळा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट केले. स्व. सुनिल सोनी यांच्या दूरदृष्टीच्या शैक्षणिक व्हिजन मधून पडीक व गलिच्छ जागेतून आज देशभरात नावारूपाला आलेली महानगरपालिकेची छत्रपती शाहू महाराज शाळा उभारली गेली असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल मनात असलेला आदर या नामकरणातून व्यक्त झाला असल्याचे सांगितले. दर वर्षी वाढणारी पटसंख्या हे नवी मुंबईच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करतात तेव्हा किती दर्जेदार कार्य उभे राहते याचे छत्रपती शाहू महाराज शाळा हे चांगले उदाहरण आहे, हे स्पष्ट करीत माजी महापौर तथा नगरसेवक श्री सुधाकर सोनवणे यांनी स्व. सुनिल सोनी यांनी त्यावेळी त्वरित निर्णय घेऊन या भागातील वंचित घटकांना शाळेच्या रूपाने शिक्षणाची दारे खुली करून दिली व त्यामुळेच आज या भागातील हजारो कुटुंबे शिक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आली. त्या परिवर्तनाच्या भूमिकेला सलाम करीत स्व. सुनिल सोनी यांच्याविषयी मनात असलेली कृतज्ञता या सभागृह नामकरणातून साकारली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शाळेच्या विद्यार्थ्यांनी ठाकर लोकगीताचे नृत्य सादरीकरण केले. तसेच या वेळी स्व. सुनिल सोनी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामांचे व शाळेच्या प्रगतीचे दर्शन घडवणारी चित्रफित सादर करण्यात आली. शाळेची आजची प्रगती हीस्व. सुनिल सोनी यांनी त्यावेळी घेतलेल्या शाळा उभारण्याच्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे झाली या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारे नृत्यगीतहीउपस्थितांची दाद घेऊन गेले. शाळेच्या बालवाडी व खेळवाडीच्या वार्षिक पुस्तिकेचेही अनावरण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी श्री. सुमित मल्लिक यांनी शाळेतील आकर्षक बाग व उपक्रमांची पाहणी केली तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही संपन्न झाले.