* डॉ.संजीव नाईक यांच्या मागणीनंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्णय * हजारो डिएमएलटीधारकांना दिलासा
ठाणे :- ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने डिएमएलटी लॅब धारकांना केलेली नोंदणीची सक्ती अखेर रदद करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली डिएमएलटी लॅब धारकांच्या संघटनांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटले. या व्यावसायिकांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन पॅरावैद्यकीय परिषदेची स्थापना करीत असून तोपर्यंत पालिकेकडील नोंदण्ीा प्रक्रीयेला स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉ. नाईक यांनी आयुक्तांना केली असता ती आयुक्तांनी त्यांनी मान्य केली आहे. या निर्णयामुळे पालिका हददीतील हजारो डिएमएलटी लॅब धारकांना न्याय मिळाला आहे.
डॉ.नाईक यांच्या समवेत आयुक्त जयस्वाल यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ शिवदास भोसले, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल चव्हाण, समीर उन्हाळे, नगरसेवक मुकुंद केणी, नगरसेवक सुहास देसाई, परिवहन समितीचे सदस्य तकी चेउलकर, डिएमएलटी तत्सम पदवीधर असोसिएशन महाराष्ट्र, ठाणे डिस्ट्रीक्ट क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिशन, ऍक्लॅप(ठाणे जिल्हा) या संघटनांचे प्रतिनिधी अरविंद यादव, श्याम यादव, उमेश वरघट, संकेत डोईफोडे, संजय शाह, गणेश झोरे, पी आर पवाळकर यांच्यासह सुमारे १०० डिएमएलटी व्यावसायिक उपस्थित होते.
ठाणे महापालिकेने ९ एप्रिल २०१८ रोजी वृत्तपत्रांत जाहिरात देवून डिएमएलटी व्यावसायिकांसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी सक्तीची केली होती. नोंदणी न केल्यास १ मे पासून दंडात्मक कारवाई ५० रुपये प्रतीदिन वसूलण्याचा इशारा दिला होता. या व्यावसायिकांनी ही अन्यायकारक बाब डॉ.संजीव नाईक यांच्याकडे मांडली. डॉ.नाईक यांनी लगेचच आयुक्त जयस्वाल यांच्याबरोबर बैठक लावली.
बैठकीत पालिकेने दिलेली नोंदणीविषयक जाहिरात ही २४/५/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार काढण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. त्यावर डॉ.नाईक आणि डिएमएलटी व्यावसायिकाच्या प्रतिनिधींनी आयुक्तांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. २४/५/२०१६ रोजीचा सदर शासन निर्णय २६/५/२०१६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारेच रदद करण्यात आला होता. त्यामुळै २४-५-२०१६ च्या जीआरच्या आधारे पालिका नोंदणीची सक्ती करु शकत नाही, असा मुददा डॉ.नाईक यांनी मांडला.
पॅरावैद्यक व्यावसायिकांच्या नोंदणीसाठी व त्यांच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात १/७/२०१७ रोजी महाराष्ट्र पॅरावैद्यक कायदा लागू केला असून १८/१०/२०१७ रोजी पॅरावैद्यक परिषद कार्यांन्वित देखील झाली आहे. या कायद्यानुसार ही परिषदच डिएमएलटी व्यावसायिकांची रितसर नोंदणी करणार आहे. त्यामुळे परिषदेच्या वतीने जोपर्यत महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेची नोंदणी प्रक्रीया सुरु होत नाही तोपर्यत ठाणे महापालिकेतील डिएमएलटी लॅब धारकांच्या नोंदणीची प्रक्रीया रदद करण्यात यावी, अशी मागणी डॉ.नाईक यांनी केली असता आयुक्त जयस्वाल यांनी ती तात्काळ मान्य केली.
डॉ.संजीव नाईक यांच्या पुढाकारामुळे ठाणे पालिकेने केलेली नोंदणीची सक्ती रदद झाल्याबददल सर्व डिएमएलटी लॅब धारक संघटनांच्या वंतीने अरविंद यादव, श्याम यादव यांनी डॉ.नाईक यांचे आभार मानले आहेत तर आयुक्त जयस्वाल यांनी या प्रश्नी घेतलेल्या सकारात्मक भुमिकेचे डॉ.नाईक यांनी स्वागत केले आहे.