स्वयंम न्युज ब्युरो :- ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आठही विभाग कार्यालयांच्या हद्दीतील जनतेशी थेट संबंधित सेवा व नागरी सुविधा पूर्तता यांचा विशेष बैठकीतून सविस्तर आढावा घेतला असून लोकहिताय काम करावे अशा सक्त सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या आहेत.
मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात झालेल्या या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, शहर अभियंता श्री. मोहन डगावकर, परिमंडळ उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे व श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त श्री. तुषार पवार, तसेच सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व विभागीय पातळीवरील संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनापरवानगी एकही बांधकाम उभे राहू नये व अनधिकृत बांधकामांना कायदेशीररित्या नोटीसा बजावून त्यांचा नोटीस कालावधी संपल्यानंतर त्वरित निष्कासन करावे अशी काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सक्त निर्देश दिले आहेत. अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे यावर निर्बंध आणण्यासाठी विभाग पातळीवर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या क्षेत्रनिहाय जबाबदा-या यापूर्वीच निश्चित करून देण्यात आलेल्या असून त्यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी निक्षून सांगितले. याबाबत प्रत्येक पंधरवड्यात विभाग अधिकारी आणि विभागाचे उपअभियंता यांनी आपल्या विभागीय क्षेत्रात अनधिकृत बांधकाम उभारले जात नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावयाचे असून प्रत्येक महिन्यात सर्व विभागांचा एकत्रित आढावा घेण्यात येईल असे आयुक्तांनी सूचित केले.
महानगरपालिका क्षेत्रात लागणारे होर्डींग, बॅनर्स हे निश्चित केलेल्या जागांवर रितसर परवानगी घेऊनच लागतील याची दक्षता सर्व विभाग अधिकारी यांनी घ्यावयाची असून दररोज सकाळच्या सत्रात अनधिकृत होर्डींग, बॅनर्स काढून टाकण्याची व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
अशाचप्रकारे विद्युत् खांबांवर लोंबकळणा-या विविध केबल्समुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहचत असून त्या काढून टाकण्याची विशेष मोहीम राबविण्यात यावी असे सूचित करतानाच आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी एम.एस.सी.बी.च्या उघड्या केबल्समुळे तसेच ट्रान्सफॉर्मर बॉक्समुळे होणा-या संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन त्याविषयी संबंधितांना तात्काळ सुरक्षित कार्यवाही करणेस सूचित करावे असे सांगितले. विद्युत खांबावर लावल्या जाणा-या विनापरवानगी जाहिराती काढून टाकून त्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी असे त्यांनी निर्देशित केले.
रस्त्यांवर तसेच पदपथांवर बसणा-या अनधिकृत फेरिवाल्यांमुळे रहदारीला होणारा त्रास लक्षात घेऊन सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळांसाठी स्वतंत्र पथके स्थापन करून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांचा रस्ते, पदपथांवर चालण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही याची पुरेपुर दक्षता घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले. विशिष्ट ठिकाणी भरणा-या आठवडी बाजारामुळे नागरिकांना होणारा त्रास व वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्या विरोधातही धडक मोहीम राबवून ते कायमस्वरूपी बंद करावेत असे आयुक्तांनी निर्देशित केले.
महानगरपालिका परिसरात कुठेही, कशाही पध्दतीने अनधिकृतपणे टाकल्या जाणा-या डेब्रिजमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत असून हे नवी मुंबई शहराच्या स्वच्छ शहर नावलौकिकाला बाधा पोहचविणारे आहे. यामुळेच डेब्रीजबाबत गांभिर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करावे असे निर्देश देतानाच आयुक्तांनी पोलीस कंट्रोल रूममधून मागील सहा महिन्यांचे सी.सी.टि.व्ही. फुटेज घेऊन त्यात आढळून येणा-या गाड्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच यापुढे अनधिकृतपणे डेब्रिज टाकणा-या वाहनांवर सी.सी.टि.व्ही.च्या माध्यामतून लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे आयुक्तांनी प्रत्येक ठिकाणच्या दैनंदिन स्वच्छतेकडे अभियान कालावधीप्रमाणेच स्वच्छता हे आपले नियमित कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. विविध विभागांमध्ये असलेल्या नागरी आरोग्य केंद्रांची दुरूस्तीसह रंगरंगोटी करून तसेच त्याठिकाणी आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देऊन तेथे येणा-या रूग्णांना प्रसन्न वाटेल असे वातावरण निर्माण करण्याचे त्यांनी सूचित केले. सर्वच नागरी आरोग्य केंद्रे एकसारखीच दिसतील व तेथील व्यवस्था सर्व नागरी आरोग्य केंद्रात सारखीच असेल अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे तिन्ही रूग्णालयांमध्ये आलेली वैद्यकीय उपकरणे नागरिकांसाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशित केले.