दीपक देशमुख
* ‘महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे’ चा जयघोष करत मनसैनिकांचा सिडकोे मुख्यालयात ठिय्या
* मनसेचे महाराष्ट्र भवनकरिता सिडको संचालक एमडी दालनात आंदोलन
नवी मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र भवनच्या मागणीकरिता मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे व त्यांच्या सहकार्यांनी प्रशासकीय पातळीवर मनसेच्या स्टाईलने पाठपुरावा सुरू केला आहे. नवी मुंबईत देशातील इतर राज्यांची भवने दिमाखात उभी असताना सिडकोने महाराष्ट्र भवनाच्या निर्मितीकरिता केलेला कानाडोळा यावर मनसेने गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आपला संतापही व्यक्त केला आहे. इतर पक्ष महापालिका मुख्यालयात मिठाई मिळविण्यात व्यस्त असताना मनसेच्या गजानन काळेंच्या मार्गदर्शनाखाली आज पुन्हा सिडको मुख्यालयात मनसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्यामुळे नवी मुंबईकरांसमोर महाराष्ट्र भवनचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे.
१९ एप्रिल रोजी मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात घुसून ‘महाराष्ट्र भवन’बाबत जोरदार घोषणाबाजी गगराणी यांच्यासमोर केली. यावेळी मनसैनिकांनी सिडको व राज्य शासनाविरोधात घोषणा देऊन सिडको भवन परिसर दुमुदुमून सोडला. ‘महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे’, ‘झालेच पाहिजे’, ‘सिडको आणि राज्य शासनाचा निषेध असो निषेध असो’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ या घोषणा महाराष्ट्र सैनिकांनी यावेळी दिल्या. तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनाच्या प्रवेशद्वाराला ‘महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे’ असा फलक चिपकविला. या आंदोलनात मनसेचे संदीप गलुगडे, निलेश बाणखेले, श्रीकांत माने, नितीन चव्हाण, स्वप्नील गाडगे, राजेंद्र खाडे यांचा समावेश होता.
गेल्या ३ महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र भवनसाठी पाठपुरावा करत असून, मागच्याच महिन्यात महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित भूखंडावर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मराठी भाषा दिनी मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र भवनचा नामफलक लाऊन आंदोलन केले होते. वाशी सेक्टर-३०अ येथे सिडकोने महाराष्ट्र भवनसाठी दोन एकरचा भूखंड गेली १५ वर्षांपासून आरक्षित ठेवला आहे. पण आजतागायत त्या ठिकाणी भूमिपूजन व महाराष्ट्र भवनची साधी वीट ही रचली गेलेली नाही. सदर भूखंडावर काही महिन्यांपूर्वी ही जागा महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असल्याचा नामफलक सिडकोने लावला होता मात्र काही महिन्यांपासून तो फलक सदर भूखंडावर दिसत नसल्यामुळे सदर भूखंड सिडकोला बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सातत्याने पाठपुरावा करूनही राज्यशासन व सिडको या संदर्भात गंभीर नसून गेल्याच आठवड्यात पोलीस भरतीसाठी राज्यातील ग्रामीण भागातून शेकडोंच्या संख्येने आलेल्या तरुणांच्या गैरसोयीचा मुद्दा ताजाच आहे. महाराष्ट्र भवनची सोय नसल्यामुळे या मुलामुलींचे प्रचंड हाल झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पहिले . मनसेनेच या मुला मुलींची राहण्याची व जेवणाची सोय केली होती. उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटका, ओरिसा, राजस्थान या व इतर राज्यांची भवन वाशीत दिमाखात उभी असताना महाराष्ट्र भवन बद्दलच सिडको व राज्य शासनाला आकस का ? असा सवाल मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. बेलापूर विधानसभेत सत्ताधारी आमदार असून सुद्धा महाराष्ट्र भवन होत नसल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये नाराजी असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थिती १ मे ला सदर भूखंडावर महाराष्ट्र भवनचे भूमीपूजन करणार असा इरादा मनसेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बाणखेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
शिक्षणसम्राटांना दणका, त्यापाठोपाठ मंत्रालयात ठिय्या आंदोलन, पीडब्ल्यूडीला रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसे स्टाईलने विचारणा, महापालिका प्रशासनाला नागरी समस्यांबाबत धारेवर धरणे यापाठोपाठ आता मनसेच्या गजानन काळे व त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्र भवनचा पाठपुरावा सुरू केल्याने मनसेचे इंजिन मराठीचा गजर करत महाराष्ट्रीयन जनतेच्या अस्मितेलाच फुंकर घालत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.