दिघा रेल्वे स्टेशन नियोजित जागेतच उभारा
माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्टेशनची उभारणी नियोजित जागीच करावी आणि या रेल्वे स्थानकाचे काम मुदतीत पूर्ण करावे त्याचबरोबर दिघा रेल्वे स्टेशनचे दिघे असे नामांतर करू नये, अशी मागणी माजी खासदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबईत झपाटयाने होणारे नागरीकरण, येथील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत, कृषी उत्पन्न बाजार समिती, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले हे सर्व पाहता डॉ.नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षी नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठ दिघा रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्याची मागणी केली होती. रेल्वे विकास महामंडळाच्यावतीने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३(एमयूटीपी-३) च्या माध्यमातून त्याला मूर्त स्वरूप मिळाल्याबद्दल डॉ.नाईक यांनी रेल्वे बोर्डाचे आणि आता पर्यंतच्या सर्व रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत. २०१३साली दिघा रेल्वे स्टेशनची उभारणी करण्याच्या अनुषंगाने रेल्वे, एमआरव्हीसी, नवी मुंबई महानगर पालिका आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या स्थानकासाठी पोल क्रमांक-ई एस-३६/२० ते ३६/३२ ही जागा निश्चित केली होती. दिघा रेल्वे स्टेशनची निर्मिती या नियोजित ठिकाणी केल्यास या स्थानकापासून ऐरोली रेल्वे स्टेशन २.२८ कि.मी. वर तर ठाणे रेल्वे स्टेशन ३.४९ कि.मी. अंतरावर येते. दिघा गाव आणि ऐरोली-रबाळे परिसरातील आधोगिक पट्ट्यात नोकरी निमित्त येणार्या चाकरमान्यांना या स्थानकाचा फायदा होणार आहे. दिघा रेल्वे स्टेशनच्या संदर्भात जागा निश्चित केल्यानंतर आता रेल्वे बोर्डाने या स्थानकाची जागा बदलली आहे. रेल्वेने दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या निविदा देखील काढल्या आहेत. परंतु जागा बदलल्यामुळे पुन्हा दिघा रेल्वे स्थानिक बांधणीतील तांत्रिक प्रकिया लांबणार आहे त्यामुळे नागरिकांच्या सोयीकरिता नियोजित ठिकाणीच दिघा रेल्वे स्टेशन उभारावे, अशी आग्रही मागणी डॉ.नाईक यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
**********************************
दिघे नाही दिघाच
नवी मुंबईतील दिघा गांव ही जुनी ग्रामस्थांची नगरी आहे. दिघा बाबा मंदिर, दिघा तलाव ही याची पारंपरिक ओळख आहे.असे असताना रेल्वेच्या अधिकार्यांनी सॅटेलाईट सर्वेक्षण करून दिघा ऐवजी दिघे रेल्वे स्टेशन असा फलक मागील आठवड्यात उभारला आहे. रेल्वेने दिघा रेल्वे स्टेशन असेच या स्थानकाचे नाव ठेवावे, अशी मागणी देखील डॉ.संजीव नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.