नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महाराष्ट्र निवड निर्णायक कार्यकारिणीवर ठाणे जिल्ह्यातून बिनविरोध निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यापूर्वीही “लग्नबंबाळ” या विजय केंकरे दिग्दर्शित व सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर अभिनित राज्य पुरस्कार प्राप्त नाट्य निर्मितीतून नाट्य चळवळीशी जोडले गेलेल्या श्री. विजय चौगुले यांचे या निवडीबद्दल अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, उप महापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. विशाल डोळस, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतोद डॉ. जयाजी नाथ, भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रतोद श्री. रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलावंत, खेळाडूंचा महापालिका सर्वसाधारण सभेप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 57 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2017 – 18 मध्ये ‘सल’ नाटकातील भूमिकेबद्दल राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्राप्त अभिनेते श्री. अशोक पालवे तसेच राजस्थानातील जयपुर फिल्म फेस्टीवलध्ये उत्कृष्ट लघुपट व उत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार आणि अहमदाबाद येथे झालेल्या गुजरात फिल्म फेस्टीवल मध्ये देशातील 100 लघुपटातून उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्राप्त करणारे पिंडदान लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते तथा महानगरपालिकेच्या राजीव गांधी क्रीडांगणात माळी कामगार म्हणून कार्यरत असणारे कलावंत श्री. प्रेमेश बोस यांना सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे सिनियर इंडियन नॅशनल टिममध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करत ‘ट्राय नेशन कप 2017’ या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेत्या भारतीय संघात फुटबॉल खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच ‘ए.एफ.सी. कप चॅम्पियनशिप क्वालिफायर्स 2016-17’ मध्ये 23 वर्षाखालील भारतीय संघातही प्रतिनिधित्व करत फुटबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविणारे फुटबॉलपट्टू कु. निखिल पुजारी यांचाही गौरव करण्यात आला.