नवी मुंबई :- ’मी वचन दिल्याप्रमाणे मागील २२ वर्षे नवी मुंबईत पाणीपटटी आणि मालमत्ता करात पालिकेने वाढ केलेली नाही. पुढील अडीच वर्षे आणि शक्य झाल्यास त्यापुढील पाच वर्षे देखील ही करवाढ करणार नाही’, अशी जाहिर घोषणा माजी मंत्रीे गणेश नाईक यांनी केली आहे.
स्थानिक नगरसेवक तथा पालिकेतील सभागृहनेता रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक १०० मध्ये मंजुर झालेल्या विवीध नागरी कामांचा शुभारंभ श्री नाईक यांच्या हस्ते रविवारी झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आदी उपस्थित होते.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी जवळच्या शहरांपेक्षाही भौगोलिकदृष्या आकाराने लहान असलेल्या नवी मुंबईने विकासाच्या बाबतीत मात्र या शहरांपेक्षा मोठी झेप घेतल्याचे सांगून उत्पन्न आणि खर्चाचा उत्तम ताळमेळ नवी मुंबई पालिकेत पहावयास मिळतो, असे लोकनेते म्हणाले. इतर पालिकांच्या तुलनेते नवी मुंबई पालिकेचा प्रशासकीय खर्चही कमी असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षापासून पालिका शाळांमधून इंग्रजी नर्सरीचे वर्ग सुरु होणार असून अशा प्रकारे शिक्षण देणारी नवी मुंबई पालिका ही एकमेव पालिका असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहर विकासात काम करणार्या लोकप्रतिनिधींच्या मागे गणेश नाईक यांचे मार्गदर्शन आणि बळ आहे. त्यामुळेच नवी मुबईकर सोयी सुविधांच्या बाबतीत आघाडीवर आहेत. असे मत व्यक्त करुन अच्छंें दिनच्या जाहिरातींना आपण भुललो. लाटेत वाहवून गेलो आणि आपले नुकसान करुन घेतले, अशी खत व्यक्त करुन महापौर जयवंत सुतार यांनी चुक दुरुस्त करण्याची वेळ आल्याच्या भावना व्यक्त केल्या.गणेश नाईक आमदार असते तर नागरिकांना नको असणारा आरटीओचा ब्रेकींग टेस्ट ट्रॅक नेरुळमध्ये झालाच नसता, असेही महापौर म्हणाले.