ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार व ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य बहूजन वर्गाला, तळागाळातील उपेक्षित जनतेला आपल्या घरातील वाटणारे उमदे नेतृत्व संदीप नाईक. विद्यार्थी नेता संदीप नाईक, गोरगरीब मित्रांच्या गळ्यातील ताईत असणारे संदीप नाईक, उपेक्षित व तळागाळातील सर्वसामान्य जनतेला आपल्या घरातीलच एक सदस्य वाटणारे संदीप नाईक, नगरसेवक संदीप नाईक, स्थायी समिती सभापती संदीप नाईक, आमदार म्हणून अधिवेशनात शंभर टक्के हजेरी लावणारे संदीप नाईक, मोदी लाटेतही कामाच्या व जनसंपर्काच्या बळावर दुसर्यांदा दिमाखात विधानभवनात जाणारे संदीप नाईक. अशा विविध रूपांमध्ये आमदार संदीप नाईकांना नवी मुंबईतील नाही तर समस्त ठाणे जिल्ह्यातील जनता ओळखते. संदीप नाईकांना आमदारपदासोबत सर्वसामान्य जनता नवी मुंबईचा ओबामा याच नावाने पुकारते. आमदार संदीप नाईकांचा उल्लेख करताना आमचा ओबामा असाच करते. ओबामा नाव उच्चारताना संदीप नाईकांवर एकप्रकारे प्रेम, अधिकारच तळगाळातील जनता दाखवून देत असते. यंदा ४ ऑगस्ट २०१८ रोजी नवी मुंबईचा ओबामा वयाची ४० वर्षे पूर्ण करत आहेत. ४० वर्षे वयामध्ये महाराष्ट्राने आमदार पाहिले आहे, नामदार पाहिले आहे, मुख्यमंत्रीही पाहिले आहे. त्यामुळे येत्या ४ ऑगस्टनंतर ओबामानेही आपले राजकीय कार्यक्षेत्र विस्तारावे अशीच अपेक्षा ओबामाच्या भोळ्या भाबड्या समर्थकांकडून, निष्ठावंतांकडून व तळागाळातील गोरगरीब जनतेकडून व्यक्त केली जात आहे. हे नेतृत्व आकाशाला कवेत घेणारे आहे, इतपत या नेतृत्वाची क्षमता आहे. या नेतृत्वाने केवळ ऐरोली विधानसभा मतदारसंघापुरतेच सिमित राहणे म्हणजे आकाशाला गवसणी घालू पाहणार्या आणि जमिनीत तळाशी खोलवर पाळेमुळे रोवलेल्या विशाल वृक्षाने स्वत:ला स्वत:हून ‘बोनसाय’ करून घेण्यासारखे आहे. आमदार संदीप नाईक हे जर स्वत:च्या कर्तृत्वाला विशिष्ठ चौकटीत बांधून ठेवण्यात समाधान मानत असतील तर तो या महाराष्ट्राच्या भूमीवर अन्याय आहे आणि हे पातक संदीप नाईक का करत आहे, ते आजवर एक न उलगडलेले कोडे आहे. संदीप नाईकांनी विशिष्ठ कार्यक्षेत्रापुरते स्वत:ला सिमित ठेवून जोखड बांधून घेतले तर तो त्यांच्या कार्यकर्त्यांवर, समर्थकांवर, निष्ठावंतांवर अन्याय करणारे आहे. आज संदीप नाईकांना महाराष्ट्र वेगळ्या नजरेने पाहत आहे. आमदार संदीप नाईकांच्या पंखात गरूडभरारीचे बळ नक्कीच आहे, मग भरारी घेण्यासाठी त्यांना कोणत्या ब्राम्हणाकडून मुहूर्ताची प्रतिक्षा हवी आहे काय? क्रिकेड वेड नसानसात भिनलेल्या संदीप नाईकांनी स्वत:ला राष्ट्रीय संघात क्षमता असताना गल्ली क्रिकेटमध्ये का वेळ घालवावा हीच एक मुळी संतापजनक बाब आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. मुसळधार लाटेने या बांधाला कोणी तरी फोडले पाहिजे. वार्याच्या झुळकेने आता चक्रीवादळ झाले पाहिजे. आमदार संदीप नाईकांना हे समजावून देण्याची, पटवून देण्याची आता योग्य वेळ आली आहे, त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेला न्याय दिलाच पाहिजे.
संदीप नाईक म्हणजे आमचा ओबामा. एकवेळ घरातील सदस्यांवर आमचा अधिकार कमी असेल पण आमच्या ओबामावर आमचा अधिकार जास्त आहे, असे ओबामाचा कार्यकर्ता छातीठोकपणे सांगत असतो. संदीप नाईकसाहेब हे भाग्य राजकारणात क्वचितच कोणाला लाभते आणि तुम्ही खरोखरीच नशिबवान आहे. असे कडवट कार्यकर्ते तुमच्याकडे शेकडोच्या संख्येने आहेत. तुमचे कार्यकर्तेच तुम्हाला न सांगता तुमच्या स्वराज्यासाठी परिश्रम करत असतात, तुमची भूमिका ठरवित असतात. त्यासाठी ते तुमच्याशी विचार विनिमयही करत नाही. कारण त्यांना त्याची आवश्यकताही वाटत नाही. कारण तुमचा त्यांच्यावर विश्वास असतो आणि त्यांची तुमच्यावर श्रध्दा असते. राजकारणात निष्ठा विकली जाते व खरेदी केली जाते. परंतु नेतृत्वावर श्रध्दा असणारा कार्यकर्ता कधीही विकला जात नाही आणि राजकारणातील विरोधक असा प्रामाणिक कार्यकर्ता कधीही खरेदी करू शकत नाही. हे भाग्य आज तुम्हाला लाभले आहे. त्या भाग्याचा असा अपमान करू नका. तुमचेच कार्यकर्ते तुमच्याच स्वराज्यात कोणी हंबीरराव मोहीते होतो, तर कोणी गडकरी तर कोणी मावळा बनतो. कोणी त्याही पलिकडे जावून तुमचा बर्हिजी नाईक बनून विरोधकांच्या लंकेमध्ये कोणी बिभिषण आहे का, विरोधकांच्या छावणीतील नाराज व असंतुष्ठ असलेली मंडळी बिभिषण बनून आपल्याला मदत करेल का, हा नाराज बिभिषण विरोधकांच्या लंकेतील बिभिषण आपल्याला कितपत उपयुक्त ठरेल याचीही माहिती तुम्हाला तंतोतंत देत असतो. त्यामुळेच तुम्ही बालाजीवर असा, अथवा क्रिस्टल हाऊसला असा, अथवा अधिवेशनात असा, तुम्हाला विस्तृतपणे माहिती मिळालेली असते. हे त्यांना तुम्ही सांगितलेले नसते अथवा तुम्हाला खुश करण्यासाठी ते हे करत नाही. त्यांना पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक बनायचे नाही अथवा एमआयडीसीतील कंत्राटदारही बनायचे नसते. केवळ संदीप नाईकांवर असलेल्या प्रेमापायी गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. अडचणीच्या काळात हे पदाधिकारी, ठेकेदार, नगरसेवक व मलिदा लाटणारी स्वार्थी अपप्रवृत्ती साथ सोडून जातील, पण तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी त्या पडत्या काळातही बालाजीच्या तळाशी व क्रिस्टल हाऊसच्या समोर तुमची प्रतिक्षा करताना पहावयास मिळतील, याची तुम्हालाही नक्कीच खात्री असणार.
महाराष्ट्राच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजता येतील अशी फार कमी उच्च विद्या विभूषित मंडळी सक्रिय आहेत. त्यामध्ये आमदार संदीप नाईकांचा प्राधान्याने समावेश हा करावाच लागेल. एका आमदाराचा, मंत्र्यांचा मुलगा असताना, महापौरांचा भाऊ असताना संदीप नाईकांनी राजकारणात प्रवेश करताना कधीही डोक्यात हवा घुसू दिली नाही. मोठ्या पदावर अधिकार न सांगता, हक्क न दाखविता संदीप नाईकांनी तळागाळातील बहूजनांपासून सुरूवात केली. सर्वसामान्य जनतेला आपलेसे करण्याला प्राधान्य दिले. विद्यार्थी चळवळ करत करत त्यांनी राजकीय वाटचालीला प्राधान्य दिले. महापालिकेच्या तिसर्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश केल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सभागृहात स्पष्ट बहूमत होते. अशा वेळी त्यांना स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्यासाठी त्यांना कोणीही विरोध केला नसता. पण अशा वेळी मी सभागृहात नवखा आहे, मला अभ्यासासाठी थोडा वेळ लागेल असे नम्रपणे सांगत पद स्वीकारण्यास संदीप नाईकांनी नकार दिला होता. त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. स्थायी समिती सदस्य म्हणून दोन वर्षे काम केल्यावरच संदीप नाईकांनी स्थायी समितीचे सभापती पद स्वीकारले. आधीच्या काळात प्रशासनाने सादर केलेल्या कागदोपत्री माहितीवर स्थायी समिती सभापती वातानुकूलित कार्यालयात बसून स्थायी समितीचा म्हणजेच नवी मुंबई महापालिकेच्या अर्थकारणाचा गाडा हाकलेला आहे. पंरतु रूळलेल्या वाटेवरून चालणे संदीप नाईकांना कधी जमले नाही आणि जमणारही नाही. त्यांनी स्थायी समितीचा कारभार हा जनताभिमुख असावा आणि जनसामान्यांना अपेक्षित असावा ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. पावसाळी पूर्व कामांचा आढावा त्यांनी महापालिकेच्या वातानुकूलित कार्यालयात बसून न घेता प्रभागाप्रभागात फिरून घेतला. गटारे, नाले, डोंगराळ भाग, झोपडपट्ट्या, चाळी, दगड खानी, माथाडी वसाहती, सिडको परिसर आदी ठिकाणी स्वत: जावून घेतला. पायपीट केली. जनतेशी सुसंवाद साधला. नाले किती तुंबतात, घरामध्ये पाणी येते का, पावसाळ्यात साथीचे आजार येतात का, महापालिकेच्या योजना आपणापर्यत पोहोचतात का याची प्रत्यक्ष जनतेशी विचारणा करून खातरजमा करून घेतली. ‘सभापती आपल्या प्रभागात ’ हे अभियान राबविताना नवी मुंबईचा अधिकांश भागाची आमदार संदीप नाईकांनी पायपीट केलेली आहे. नवी मुंबईतील अधिकांश भागाची पायपीट करणारे संदीप नाईक हे नवी मुंबईतील एकमेव नेतृत्व आहे. ‘सभापती आपल्या प्रभागात’ यातून जनतेशी जवळीक हा कोणताही राजकीय स्टंट नव्हता याचा प्रत्यय नवी मुंबईकरांना ३ ऑगस्ट २००७ रोजी वाशी सेक्टर १७ येथे पहावयास मिळाला. या दिवशी मुसळधार पाऊस संततधार स्वरूपात सुरुच होता. सर्वत्र पाणी तुंबले होते. वाशीमध्ये विश्वज्योती हॉटेलसमोर एसएससी बोर्ड कार्यालयालगत नाला पूर्णपणे तुंबला होता. या ठिकाणी पालिका अधिकारी उपस्थित होते. सानपाडा पामबीच भागातील मनसेचे पदाधिकारी त्यावेळी नागरी समस्यांचे निवेदन घेवून त्या ठिकाणी आमदार संदीप नाईकांना भेटण्यासाठी आले होते. तुंबलेला नाला, रस्त्यावरून वाहणारे पाणी, पसरलेली दुर्गंधी यावर मनपा प्रशासनाचे अधिकारी चर्चा करत असल्याचे पाहून संदीप नाईकांना राग अनावर झाला, छातीएवढ्या पाण्यातील नाल्यात ते स्वत: उतरले. अंगावरच्या कपड्याची व पदाची तमा न बाळगता नाल्यात अडकलेला कचरा त्यांनी बाहेर फेकण्यास सुरूवात केली. (त्यानंतरही राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून नालेसफाई राबविण्यात आली. नाल्यात उतरले पण हातात ग्लोव्हज व पायात बूट होते.) संदीप नाईकांनी उत्स्फूर्तपणे केलेली जनसेवा व नाल्यात उतरण्याचा निर्णय यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आपला खरा कैैवारी सापडल्याची उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया उमटली. विशेष म्हणजे या घटनेचे संदीप नाईकांनी कोठेही फोटोसेशन केले नाही व बातमी यावी यासाठी प्रयत्नही केले नाही. प्रेसनोट देवून अथवा थातूरमातूर आंदोलन करून मिडीयाच्या कुबड्या घेवून प्रसिध्दी मिळवू पाहणार्या मंडळींकरिता आमदार संदीप नाईकांनी न सांगता लगावलेली ती एकप्रकारे चपराकच होती. त्यामुळेच संदीप नाईकांना जितके मताधिक्य मिळाले, तितकी मतेही प्रेसनोट घेवून बातम्या छापून आणणार्या मंडळींना नवी मुंबईच्या दोनही विधानसभा मतदारसंघात मिळालेली नाहीत. जनसेवा ही उथळ नसावी, प्रसिध्दीकरिता केलेली नसावी ही संदीप नाईकांची भूमिका आहे.
आमदार संदीप नाईकांकडून नवी मुंबईत वारंवार रोजगार मेळावे आयोजित केले जातात. नवी मुंबईतील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्षही उघडलेला आहे. नवी मुंबईतील बेरोजगारीचा भस्मासूर संपुष्ठात आणण्यासाठी त्यांचे भगिरथ प्रयत्न सुरू आहेत, पण त्याची ते प्रसिध्दी करत नाहीत. सर्वसामान्यांची मनापासून कामे केल्यावर कोणतीही लाट आपणास पराभूत करू शकत नाही हे त्यांनी मागील विधानसभा निवडणूकीत कृतीतून दाखवून दिले आहे.
दरवर्षी पावसाळ्याप्रमाणे पितृपक्ष हा येतोच. दरवर्षी या पितृपक्षामध्ये आमदार संदीप नाईक हे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जातात. ज्यांचे निमंत्रंण येईल, त्याला संदीप नाईक टाळत नाहीत. कोणा नगरसेवकाच्या, पक्षीय पदाधिकार्यांच्या नाहीतर तळागाळातील गोरगरीब व प्रामाणिक कार्यकर्त्याच्या घरी जाण्यास संदीप नाईक प्राधान्य देतात. कार्यकर्त्याच्या आग्रहाला मान देत, त्याचा उत्साह वाढवित भोजन करून संदीप नाईक निघूनही जातात. परंतु याचे फोटोसेशन होणार नाही याची दक्षताही संदीप नाईक घेतात. त्यामुळेच उत्साहीत कार्यकर्ता संदीप नाईकांसाठी रात्रीचा दिवस एक करतो. संदीप नाईकांसाठी समाजकारण करण्यासाठी, मतांचा जोगवा मागण्यासाठी त्याला कोणा नगरसेवकाच्या अथवा पक्षीय पदाधिकार्यांच्या नेतृत्वाची गरज लागत नाही. फक्त आणि फक्त संदीप नाईकांचा नावलौकीक वाढविण्यासाठी , त्यांना विजयी करण्यासाठी असा कार्यकर्ता धावपळ करत असतो. केलेली कामे तो संदीप नाईकांना सांगतही नाही. कारण ओबामाला सर्व समजत असते. त्यामुळेच एकवेळ नगरसेवकांच्या, पक्षीय पदाधिकार्यांना शाबासकीसाठी हात आखडता घेणारा ओबामा तळागाळातील कार्यकर्त्याचा शब्द खाली पडणार नाही यासाठी काळजी घेत असतो. अशा कडवट कार्यकर्त्याचा, मित्रांचा ताफा जवळ असणे हे भाग्य नवी मुंबईत केवळ संदीप नाईकांनाच प्राप्त झालेले आहे.
विकासाचे व्हिजन श्वासागणिक जोपासून नवी मुंबईचा विकास ही आमदार संदीप नाईकांची महत्वाकांक्षा आहे. सर्वच पक्षामध्ये संदीप नाईकांचे चाहते विखुरलेले आहेत. विरोधी पक्षात असणार्या संदीप नाईकांच्या चाहत्यांमध्येही संदीप नाईकांविषयी एक आपलेपणाची व विश्वासाची भावना असते. विकासकामांची दिशा कशी असावी, नवी मुंबईकरांना काय हवे याबाबत विरोधी पक्षातील संदीप नाईकांचे चाहते त्यांना सातत्याने सूचना करत असतात. विचार विनिमय करत असतात.
संदीप नाईकांना तळागाळातील जनतेचा पाठिंबा आहे. पक्षांवर नाही तर संदीप नाईकांवर प्रेम करणार्या संख्येने मोठ्या प्रमाणावर असणार्या मित्रांची फौज संदीप नाईकांकडे आहे. नवी मुंबईच्या कानाकोपर्यात काहीही घडले तरी अवघ्या काही सेंकदात संदीप नाईकांना माहिती मिळतेच, इतके त्यांचे प्रभावशाली नेटवर्क आहे. (महाराष्ट्रातील अन्य आमदारांनी याचा आदर्श घेणे आवश्यक आहे. कारण अन्य आमदारांना त्यांच्या ठेवणीतील पत्रकारांचा फोन आल्यावर मग घटनास्थळी जाण्यासाठी त्या आमदारांना धावाधाव करावी लागत असल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे.) संदीप नाईकांच्या पाठीशी जनाधार असल्याचे निवडणूकीतूनही स्पष्ट झालेले आहे. या नेतृत्वाने आता आपल्या कार्यकक्षा विस्तारण्याची वेळ आलेली आहे. ऐरोली विधानसभा सांभाळताना हा माणूस लवकरच बेलापुर विधानसभा लढणार असल्याची चर्चाही गेल्या काही महिन्यापासून सुरू झालेली आहे. संदीप नाईक खरोखरीच बेलापुर लढणार का याची चाचपणीही विरोधी पक्षातील मंडळी करू लागली आहेत. संदीप नाईक हे ऐरोलीचे नाही तर नवी मुंबईचे नेतृत्व आहे. या माणसाने महाराष्ट्राचे लवकरच नेतृत्व करावे अशी त्यांच्या मित्र परिवाराची आणि कडवट समर्थकांची इच्छा आहे.
– संदीप खांडगेपाटील
८३६९९२४६४६