‘बिग बॉस’ मराठी या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विविध टास्क आणि कलाकारांमध्ये उडणारे खटके या साऱ्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीची बरीच चर्चा होते. अशा या घरातून गेल्या काही दिवसांपासून राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या नात्याविषयीही बऱ्याच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, अखेर राजेश या घरातबाहेर पडला आणि या घरातील घडामोडींना आणखी एक रंजक वळण मिळालं.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर राजेशने संवाद साधला. ज्याच्या माध्यमातून त्याने आपण काहीही चुकीचं वागलो नसल्याची कबुली दिली. आपल्या बाहेर येण्याचा पत्नीला फार आनंद झाल्याचंही त्याने स्पष्ट केलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर राजेशने पत्नीला मिठी मारत आनंद व्यक्त केला. रेशम टिपणीससोबतच्या नात्याविषयी सांगत राजेश म्हणाला, ‘रेशमसोबतचं माझं नातं हे आयुष्यभरासाठी असेल, ती माझी खूपच चांगली मैत्रीण असणार आहे. बिग बॉसच्या निमित्ताने मला एक जिवाभावाची मैत्रीण भेटली’, असंही तो म्हणाला. रेशम टिपणीसला आपली साथ कायम असेल असंही त्याने स्पष्ट केलं.
दरम्यान, राजेशच्या बाहेर जाण्याचे मुख्य कारण महेश मांजरेकर यांनी स्वतःच सांगितलं. कार्यक्रमात मांजरेकर राजेशला म्हणाले की, ‘तू तुझ्या खेळामुळे किंवा खेळातील टास्कमुळे बाहेर गेला नसून, रेशमसोबतची तुझी नको तेवढी जवळीक तुला विजेतेपदापासून दूर घेऊन गेली.’ प्रेक्षकांना दोघांमधील जवळीक फारशी आवडली नाही. याचाच फटका दोघांच्या मतांवर पडला. अखेर सर्वात कमी मतं मिळवून राजेश शृंगारपुरे ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून कायमचा बाहेर पडला.