नवी मुंबईतील नागरी समस्या तसेच विविध विषयांवर चर्चा
नवी मुंबई :- नवी मुंबईतील विविध नागरी समस्या तसेच प्रलंबित अनेक विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता श्री. मोहन डगावकर उपस्थित होते. सदर बैठकीत प्रामुख्याने नवी मुंबई महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या मूळ गावठाणांचा सिटी सर्व्हे बाबत चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या मुळ गावठाणांपैकी बहुतांशी मूळ गावठाणांचा सिटी सर्व्हे न झाल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनीही त्वरित जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर यांच्याशी फोनवर संपर्क साधत महापालिका हद्दीतील मूळ गावठाणांचे सिटीसर्व्हे लवकरच सुरु करणार असल्याचे सूचित केले. तसेच सदर बैठकीत फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन), नवी मुंबईतील समुद्रखाडीकिनाऱ्यांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण, नवी मुंबई क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणे, झोपडपट्टीधारकांना फोटो पास वाटप करणे, नवी मुंबई गावठाण क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्बांधणीकरिता परवानगी देणे, दिवाळे गावातील मच्छीमार्केट मागील बाजूस स्थलांतरित करून रस्ता रुंदीकरण करणे, नवी मुंबईतील तुर्भे नाका येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या नाका कामगारांसाठी स्वच्छता गृहे, नळ जोडणी व निवारा शेड उपलब्ध करणे, बेलापूर, नेरूळ व ऐरोली हॉस्पिटल समस्या, नवी मुंबईमध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मागणी, आमदार निधीतून मंजूर झालेल्या निधीतून वाशी से-9 येथील भाजी मार्केट व नेरूळ से-15 येथील मार्केट सुसज्ज तयार करणे, सानपाडा येथे स्वतंत्र विभाग कार्यालय, पावसाळी पूर्व नाले सफाई तसेच नागरी समस्या, उरण फाटा येथील आदिवासी यांना पाणी पुरवठा व रस्ता बांधणे अशा अनेक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबई महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या मुळ गावठाणांपैकी बहुतांशी मूळ गावठाणांचा सिटी सर्व्हे न झाल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पालिका हद्दीतील मूळ गावठाणांचे सिटीसर्व्हे लवकरात लवकर करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली आहे. परंतु महापालिका सदरबाबत उदासीनता दर्शवत होते. सदर विषय हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने नवी मुंबई महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या मूळ गावठाणांचा सिटी सर्व्हे करणार नसल्यास आंदोलन करण्याचा इशारा देताच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्वरित जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याशी संपर्क साधत लवकरच सिटी सर्व्हेला सुरुवात करणार असल्याचे सूचित केले. तसेच नवी मुंबईतील अनेक नागरी कामे तसेच समस्या, समुद्रखाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास, दिवाळे गावातील रस्त्यांचे रुंदीकरण, सानपाडा येथे स्वतंत्र विभाग कार्यालय, नवी मुंबईतील हॉस्पिटल समस्या, नवी मुंबईमध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मागणी, पावसाळी पूर्व नाले सफाई अशा अनेक विषयांवर चर्चा झाली असून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही सदरबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून सदर मागण्या या रास्त असून सदर सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.