आठ महिने झाली तरी पालिका प्रशासनाची उदासिनता कायम
नवी मुंबई :- केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनातील विभाग अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना गेल्या आठ महिन्यापासून प्रशासकीय कामकाज करताना स्वखर्चाने इंटरनेट वापरावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिका ही ग्रामपंचायतीतून थेट महापालिकेत रूपांतरीत झालेली राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव महापालिका आहे. १९९२ साली महापालिकेची स्थापना झाली असली तरी महापालिका प्रशासनाचा कारभार २०१२च्या अखेरीपर्यत भाड्याच्या इमारतीमध्ये चालविला जात होता. महापालिका स्थापनेनंतर तब्बल दोन दशकानंतर पामबीच मार्गावरील बेलापुर किल्ले गावठाण चौकालगत स्वमालकीच्या मुख्यालयात महापालिका प्रशासनाचा कारभार हलविण्यात आला.
नेरूळ पूर्वेला बसडेपोच्या बाजूलाच पालिका प्रशासनाच्या नेरूळ विभाग कार्यालयाचा कारभार चालविला जात होता. आठ महिन्यापूर्वी नेरूळ पश्चिमेकडील पालिका शाळा क्रमांक १०२मध्ये नेरूळ विभाग कार्यालय हलविण्यात आले. महापालिका शाळेत विभाग कार्यालय हलविण्यास या प्रभागात तीन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेविका राहिलेल्या स्नेहा पालकर यांचे पती विकास पालकर यांनी प्रशासनदरबारी विरोध केला. गणेश नाईकांसह सर्वत्र तक्रारी करून विकास पालकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तथापि पालिका प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून या शाळेत विभाग अधिकारी कार्यालय सुरू केले.
शाळेचा तळमजला आणि दुसरा मजला या ठिकाणी पालिका विभाग कार्यालयाचा कारभार चालविला जात असला तरी पालिका प्रशासनाने अजूनही या विभाग कार्यालयाला इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. संगणकीय कामकाज करताना पालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना इंटरनेटची पावलापावलावर गरज असते. परंतु महापालिका प्रशासनाने गेल्या आठ महिन्यात नेरूळ विभाग कार्यालयात इंटरनेट न पुरविल्याने येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना स्वखर्चाने इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून घेतलेली आहे. दरमहिन्याला इंटरनेटकरीता पाचशे ते हजार रूपये खर्च करावे लागत असल्याने अधिकारी व कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत पालिकेच्या प्रशासन विभागाशी संपर्क केला असता, त्यांनी या ठिकाणी इंटरनेट सुविधा देण्यास विलंब झाल्याचे मान्य करत टप्याटप्याने लवकरच सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगणकामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले.