निवासी ऐवजी वाणिज्य मालमत्ता कर आकारण्याची मनसेची मागणी
नवी मुंबई :- भारतातील स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा करत असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजात किती अनागोंदी कारभार सुरू आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मालमत्ता कर विभागाचे नाव घेता येईल . नवी मुंबईतील बड्या खाजगी क्रिडा अकादमींना नियमबाह्य निवासी कर आकारून पालिकेचा महसूल बुडविला जात असल्याचे धक्कादायक प्रकरण मनसेने उजेडात आणले आहे .
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नेरूळ सेक्टर ७ येथील डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्टस् अकादमी व ऐरोली सेक्टर ८-ए येथील ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन या अद्ययावत अशा क्रीडा संकूल उभारण्यात आल्या आहेत. सदर क्रीडा संकूलात अत्याधुनिक व्यायामशाळा,सुसज्ज तरणतलाव,मैदानी खेळाचे क्रिडांगण,खाद्यगृह,अंतर्गत क्रिडा प्रकार अशा प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. या क्रिडा अकादमीचे सभासद होण्यासाठी नागरिकांकडून लाखोंची सभासद फी आकारली जाते.
नागरिकांकडून भरमसाठ सभासद फी उकळाणाऱ्या या खाजगी क्रिडा अकादमीबाबत महानगरपालिकेचे मालमत्ता कर विभाग विशेष मेहेरनजर दाखवित आहे. सदर संस्था पूर्णपणे व्यावसायिक क्रीडा अकादमी चालवत असताना त्यांना अनिवासी/वाणिज्य मालमत्ता कराऐवजी निवासी मालमत्ता कर आकारण्यात आला असल्याचे गंभीर प्रकरण मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी उजेडात आणले आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सदर व्यावसायिक क्रिडा अकादमीना वाणिज्य मालमत्ता कर आकारण्याची मागणी सविनय म्हात्रे यांनी मालमत्ता कर विभागाकडे केली आहे. तसेच सदर क्रीडा अकादमींकडून आजपर्यंतची मालमत्ता करातील फरकाची रक्कम वसूल करण्यात यावी व या क्रिडा अकादमीनां निवासी मालमत्ता कर आकारून पालिकेचा महसूल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सविनय म्हात्रे यांना मुख्य कर निर्धारक यांच्याकडे केली आहे.