नवी मुंबई :- निवडणुकीच्या लगीनघाईमुळे नवी मुंबईतील ९ कुटुंबियांच्या लग्न समारंभात विघ्न निर्माण झाले होते. माजी खासदार डॉ.संजीव नाईक हे या चिंताग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या लग्न कार्याचा मार्ग मोकळा केला. या कुटुंबियांनी डॉ.नाईक यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत.
नेरुळमधील सिडकोचे आगरी-कोळी भवन कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अचानक २३ ते २९ जुन या कालावधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षित झाले. त्यामुळे या दिवसांत तेथे लग्नासाठी अगोदर झालेले बुकिंग सिडकोने रदद केले. उस्मान अली, अकबर अली, एन एस हमीद, एन गुप्ता, मुतल्लीफ, एम के नादगांवकर, सिध्देश नेरकर आणि रमेश हे कुटुंबिया काळजीत पडले होते. लग्न जवळ आल्याने दुसरी जागा कुठे शोधायची? असा पेच या लग्न घरातील कुटुंबियांसमोर निर्माण झाला. या कुटुंबियांनी नगरसेवक गिरिष म्हात्रे यांची भेट घेतली. ही सर्व मंडळी त्यांच्या प्रभागातील नसतानाही केवळ माणुसकी म्हणून नगरसेवक म्हात्रे यांनी त्यांची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्यासमवेत डॉ.नाईक यांची भेट घेतली आणि या चिंताक्रांत लोकांची अडचण त्यांना सांगितली. डॉ.नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची भेट घेवून आगरी-कोळी भवनमध्येच हे लग्न समारंभ व्हावेत, अशी मागणी केली. त्यानुसार ४ लग्न या भवनमध्येच होणार आहेत. उर्वरित ५ लग्नांचा प्रश्न कायम होता. डॉ.नाईक यांनी महापौर जयवंत सुतार यांना या संबधी सुचना केल्यानंतर महापौर सुतार आणि पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी जुईपाडा, जुईनगर सेक्टर २३ येथील पालिकेचे वातानुकुलित सभागृह देण्याची तयारी दर्शविली. गुरुवारी सायंकाळी संबधीत पाच कुटुबियांनी हे सभागृह प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याला पसंती दर्शविली. अशा प्रकारे ९ कुटुंबियांच्या मंगल कार्यावर आलेले संकट नाहिसे झाले आहे. त्यांनी डॉ.नाईक यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले. नगरसेवक गिरीश म्हात्रे हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.
खारघर येथे राहणारे एम के नांदगावकर यांनी २९ जुन रोजी लग्नासाठी आगरी-कोळी भवन बुक केले होते. लग्नाची सर्व तयारी पूर्ण होत आली असताना अचानक निवडणुकीच्या कामानिमित्त त्यांचे बुकींग रदद झाल्याने त्यांना धक्काच बसला. मात्र माजी खासदार डॉ.नाईक आणि नगरसेवक म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्यामुळे आमचे कार्य आता निविघ्न पार पडणार आहे, अशी प्रतिक्रीया नांदगावकर यांनी नोंदवली आहे.