मार्केटसाठी पालिकेने खर्च केलेला २५ लाखाहून अधिक खर्च पाण्यात
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे तोडण्यासाठी कारवाई करणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला शुक्रवारी सिडकोच्या जागेवर स्वत:च बांधलेल्या अनधिकृत मार्केटवर हातोडा चालविण्याची दुर्देवी वेळ आली आहे. या मार्केटच्या बांधकामासाठी खर्च झालेले २५ लाखाहून अधिक निधी पाण्यात गेला असल्याचा संताप नवी मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात कोठेही भाजी मार्केट नसल्याने भाजी विक्रेते पदपथावर तसेच हनुमान मंदिराजवळील परिसरात अनधिकृतपणे व्यवसायासाठी बसतात. यावर तोडगा म्हणून पाच वर्षापूर्वी हनुमान मंदिरालगत असलेल्या सिडकोच्या जागेवर महापालिकेने मार्केट बांधण्यात निर्णय घेतला. हनुमान मंदिरालगत असलेली सिडकोची जागा ही सुरूवातीपासून भाजी मार्केट आणि सर्व्हीस सेंटरसाठी राखीव आहे. तथापि हा भुखंड भाजी मार्केटसाठी राखीव असला तरी भुखंड सिडकोकडून महापालिकेकडून हस्तांतरीत होण्यापूर्वीच महापालिकेने त्यावर मार्केट उभारले. मार्केट बांधण्यासाठी स्थायी समिती आणि महासभेकडून मंजुरी घेणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सिडकोकडून भुखंड हस्तांतरीत करून घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. सिडकोने भुखंड हस्तांतरीत करण्यापूर्वीच महापालिकेने त्यावर आक्रमण करत भाजी मार्केटची उभारणी केली.
मार्केट बांधून झाल्यावर मार्केटचा लोर्कापण सोहळा करण्यास स्थानिक भागातील राजकारण्यांनी आणि पालिका प्रशासनाने उदासिनता दाखिवली. मार्केट तयार असून तब्बल चार वर्षे मार्केट सुरु करण्याकरिता राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर कोणत्याही हालचाली झाल्याच नाहीत. दरम्यान २०१५ साली झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर नेरूळ सेक्टर सहा परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत गेले. मच्छि मार्केटजवळील परिसरात फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत जावून आज स्थानिक रहिवाशी त्या फेरीवाल्यांच्या जागेला ‘सारसोळे मॉल’ असे उपहासात्मक संबोधू लागले आहेत. मार्केटलगत असलेली सिडकोची ‘दत्तगुरू’ सोसायटी धोकादायक घोषित करण्यात आली. तेथील रहीवाशांनी सिडकोकडून मार्केटसाठी राखीव असलेली जागा विकत घेतली. धोकादायक इमारतीमधील रहीवाशांच्या पुर्नवसन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांनी पुढाकार घेतला. आमरण उपोषणाचा इशारा दिला, महापालिका सभागृहात नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सुजाता पाटील, नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी पालिका सभागृहात ‘दत्तगुरू’च्या रहीवाशांकरिता सातत्याने आवाज उठविला. महापालिका व सिडकोला राजकारण्याच्या आक्रमकतेपुढे माघार घ्यावी लागली. शुक्रवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये महापालिका प्रशासनाने स्वत:च बांधलेले मार्केट तोडण्यास सुरूवात केली. ग्रामस्थांचे, प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटी तोडलेल्या बांधकामात पुढाकार घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला आज स्वत:चेच अतिक्रमण स्वत:च्याच हाताने तोडण्याची नामुष्की आली.
———————–
- मार्केटचा खर्च कोणाकडून वसूल करणार?
सिडकोच्या जागेवर महापालिका प्रशासनाने अतिक्रमण करून मार्केट बांधले. त्यासाठी पालिका प्रशासनाचा पर्यायाने नवी मुंबईकरांचा २५ लाखाहून अधिक निधी खर्च झाला आहे. आज महापालिकेने मार्केट तोडले असले तरी हे पाण्यात गेलेला २५ लाखाहून अधिक निधी पालिका प्रशासन कोणाकडून वसूल करणार आहे असा संतप्त प्रश्न पालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी उपस्थित केला आहे.
————————————
- शिवसेनेच्या पाठपुराव्याला अपयश
नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावाकरिता भाजी मार्केट नसल्याने हे मार्केट तोडू नये यासाठी स्थानिक भागातील शिवसेना पदाधिकारी प्रल्हाद पाटील यांनी प्रशासनदरबारी अथक पाठपुरावा केला होता. मार्केटची स्थानिक लोकांना गरज आहे, मार्केट सुरू झाल्यास फेरीवाल्यांची समस्या निकाली निघेल हे त्यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिले. हे मार्केट तोडू नये यासाठी स्थानिक विभागातील जवळपास दोन हजार लोकांच्या सह्यांचे निवेदनही त्यांनी प्रशासन सादर केले होते. महापालिकेने शुक्रवारी मार्केट तोडल्यामुळे शिवसेनेच्या मार्केटप्रकरणी पाठपुराव्याला अपयश आले आहे.