कर्मचार्यांच्या लवकरच बदल्या
संघर्ष समितीने सुचविलेल्या कामांना आयुक्तांनी दिले मुहूर्तस्वरूप
पनवेल :- शहरातील विविध भागात पाणी सोडणार्या कर्मचार्यांकडून होत असलेली दिरंगाई आणि गैरव्यवहाराला आळा घालून कृत्रिम पाणी टंचाई दूर करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाणी विभागाच्या कर्मचार्यांच्या अंर्तगत बदल्या करण्यात याव्यात, या संघर्ष समितीच्या मागणीला हिरवा कंदील दर्शवत आयुक्त गणेश देशमुख यांनी येत्या आचारसंहिता संपुष्टात येताच, कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येतील, असे आश्वासन देवून येत्या दोन ते तीन दिवसात पनवेलसह काळुंद्रे आणि महापालिका क्षेत्रात पाणी वितरण सुरळीत होईल, अशी ग्वाही त्यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार 31 मे पर्यंत महापालिकेने पाणी पुरवठ्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर यापूर्वीच संघर्ष समितीच्या सदस्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 31 मे पूर्वीच शासनाला कृती आराखडा पाठविला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली संघर्षचे सचिव चंद्रकांत शिर्के, मंगल भरवाड, रामाश्री चौहान, दर्शन ठोंबरे, अनुराग वाक्चौरे याशिवाय पटेल नगर सोसायटी आणि काळुंद्रे येथील पाटील महिला मंडळाच्या सदस्यांचा समावेश होता.
आयुक्तांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा विषयावर छेडले. त्यांनी संघर्ष समितीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाणी पुरवठा केल्याचे सांगितले. मध्यंतरी काही अंशी अपयश आले असले तरी आता देहरंग धरणात पाणी साठल्याने सुरळीत पुरवठा होईल. तक्रारींचा पूर थांबले, अशी आशा व्यक्त केली.
डॉ. गिरीश गुणे यांच्या मागणीला गेल्या दीड वर्षापासून दोन्ही आमदार, (शेकाप, भाजपा), गटनेते, विरोधी पक्ष नेते, महापालिका प्रशासनाने दूर्लक्ष केले होते. त्यानुसार कडू यांनी गेल्या चार, पाच दिवसात पाठपुरावा करून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मार्ग परिसरातील स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था करून घेतली. त्याबद्दल देशमुख यांचे कडू यांनी आभार मानले.
महापालिका क्षेत्रातील सांडपाण्याचा निचरा करणारी गटार व्यवस्था कोलमडून पडली आहे. नाले सफाई व्यवस्थित न झाल्यास पूराचा धोका शहराला उद्भवू शकतो, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. गणेश विर्सजन घाट, सुशोभिकरण, विसर्जनाच्या वेेळेला परिसरात मोठ्या दिव्यांची तात्पुरती व्यवस्था आणि नाट्यगृहात सीसीटिव्ही कॅमेर्यांचे नियोजन तसेच नाट्यगृह समितीची निर्मिती आदी महत्वाच्या आणि मुलभूत समस्यांवर जवळपास तासभर चर्चा केली.
काळुंद्रे गावाला पाणी नाही. पण बाजूच्या सिडको वसाहतींना मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने तेथील महिलांनी आक्रमकपणे मुद्दा रेटून धरला. यावर देशमुख यांनी त्वरीत कार्यवाहीचे आश्वासन दिले.