नवी मुंबईत कोळी बांधवांसाठी मच्छीमारीकरिता बंदर विकसित करण्यासाठी निधीची तरतूद करणेबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे केली मागणी..
नवी मुंबई :- नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून नवी मुंबईला एक सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, घणसोली येथील कोळी बांधवांना मासेमारी करणे सोयीचे जावे, नवी मुंबईत एक बंदर विकसित करून शासनाच्या विविध सुविधा त्यांना मिळाव्यात, तसेच मच्छीमारी व्यवसाय करण्याकरिता आवश्यक असणार्या जेट्टी, कॉंक्रीटरॅम्प, जोडरस्ता, उपहारगृह, जाळी विणण्याकरिता शेड, जीवनरक्षक जॅकेट, कोल्ड स्टोरेज, ड्राइ स्टोरेज, मासे सुकविण्याची मशीन, होलसेल मार्केट, गाळ काढणे, मच्छीमारीकरीता लागणार्या अशा विविध गोष्टींकरिता केंद्रपूरस्कृत निलक्रांती योजनेतून निधीची तरतूद करण्यासाठी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मागणी केली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई येथील बहुतांश कोळी बांधव मच्छिमारी व्यवसायावर अवलंबून असून अनेक वर्षांपासून वरील कोळीबांधव लगतच्या खाडीमध्ये पारंपारिक पद्धतीने मासेमारी करीत आहेत. वाशी गाव हे मुंबईच्या प्रवेशद्वारालगतच वसलेले असून देखील अद्याप तेथील मच्छिमार शासनाच्या सुविधेपासून वंचित आहेत.
केंद्र शासनाच्या निलक्रांती योजनेतून राज्याला भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबईलाही एक सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. नवी मुंबईत बंदर विकसित झाल्यास या शहरातील जे कोळी बांधव आहेत, त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध होऊ शकतील. सदर निलक्रांती योजनेतून मच्छिमारी व्यवसाय करण्याकरिता आवश्यक असणारी जेटी,कॉन्क्रीट रॅँप, जोडरस्ता उपहारगृह, जाळी विणण्याकरिता शेड, जीवन रक्षक जॅकेट, कोल्ड स्टोरेज, ड्राय स्टोरेज, मासे सुकविण्याची मशीन, होलसेल मार्केट, इत्यादी गोष्टी कोळी बांधवांना उपलब्ध करून दिल्यास तेथील त्यांच्या व्यवसायास चालना मिळेल तसेच कोळी बांधवांचे राहणीमान देखील उंचावण्यास मदत होईल तसेच सदर बंदर विकसित झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळून नवी मुंबई एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल. तसेच नवी मुंबईच्या विकासासाठी सदर योजनेतून निधीची तरतूद करणे गरजेचे होते, त्यानुसार ही मागणी केली असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
पुरवणी मागणीद्वारे निलक्रांती योजनेतून निधीची मागणी करताच नवी मुंबईतील दिवाळे येथे नाबार्डच्या माध्यमातून छोटे खाणी बंदर विकसित करण्यात येणार असल्याचे निवेदन राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. महादेव जानकर यांनी केले.