अमोल इंगळे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात क्रिडांगण व उद्यानालगत असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातून दुर्गंधी येत असून मॉर्निग वॉक करणार्यांना, पदपथावरून ये-जा करणार्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या शौचालयाच्या स्वच्छतेविषयी संबंधितांना योग्य ते निर्देश देण्याची लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकारी यांच्याकडे बुधवारी (दि. ११ जुलै) केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यान व क्रिडांगणाच्या बाहेर पडताना एका बाजूला महापालिका प्रशासनाने सार्वजनिक शौचालयाची निर्मिती केलेली आहे. तथापि या शौचालयाच्या स्वच्छतेविषयी महापालिका प्रशासनाने कानाडोळाच केल्याचे आजवर पहावयास मिळत असल्याचा संताप संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
या उद्यान व क्रिडांगणामध्ये जॉगिग ट्रॅकवर सकाळी मोठ्या संख्येने स्थानिक रहीवाशी, महिला येत असतात. या क्रिडांगण व उद्यानाच्या सभोवताली वॉक करताना नेमकी शौचालयाच्या जवळून जाताना महिलांना, पुरूषांना दुर्गंधीमुळे नाकावर हात ठेवून जावे लागते व आजची समस्या नाही. आपण या ठिकाणी दररोज मॉर्निग वॉकच्या माध्यमातून शुध्द हवा घेण्यासाठी येतो का या शौचालायच्या दुर्गंधीचा सामना करण्यासाठी येतो, याचाच संताप आता स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जावू लागला आहे. गेल्या काही महिन्यापासून मीदेखील याच ठिकाणी मॉर्निग वॉक करत असल्याने मलाही दररोज याच समस्येचा सामना करावा लागत आहे. आपण या सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणार्या ठेकेदार व कर्मचार्यांना नियमित स्वच्छतेचे तात्काळ निर्देश द्यावेत. तसेच स्वच्छता होत आहे अथवा दुर्गंधी येत आहे का नाही याचीही वरचेवर पाहणी करावी. समस्येचे गांभीर्य व या दुर्गंधीमुळे आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता आपण समस्या निवारणासाठी स्थानिक रहीवाशांना सकारात्मक प्रतिसाद द्याल, असा आशावाद संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.