अमोल इंगळे
नवी मुंबई :- सारसोळे जेटीवर पाण्याचा नळ नसल्याने खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सारसोळेच्या ग्रामस्थांना चिखलाने व गाळाने माखलेले पाय घेवून सारसोळे गावात जावे लागते. त्यामुळे त्यांना पायाच्या व्याधीही (आजार) जडल्या आहेत. सारसोळे ग्रामस्थांचे हे हाल दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर सारसोळे जेटीवर पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबईच्या विकासात सारसोळे गावाचे आणि सारसोळेच्या ग्रामस्थांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. नवी मुंबईच्या भूसंपादनात सारसोळेच्या ग्रामस्थांना आपली उपजिविका असलेली भातशेती गमवावी लागली आहे. खाडीत मासेमारी करून परिवाराचा खर्च भागविणे हाच अखेरचा पर्याय ते वापरतात. खाडीतून मासेमारी करून आल्यावर चिखलाचे व गाळाचे पाय घेवून २० ते २५ मिनिटे पायपीट करत डोक्यावर मासे घेवून ते सारसोळे गावात जातात. सारसोळेच्या जेटीवर पालिका प्रशासनाने नळ उपलब्ध करून दिल्यास ते हातपाय धूवून घरी जातील. चिखलाने व गाळाने माखलेले पाय घेवून तशीच पायपीट केल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांना पायाच्या आजाराची लागण झालेली आहे. सारसोळेचे ग्रामस्थांनी पाण्याच्या नळाची मागणी केल्यावर आपण जागेचे कागद मागत आहात. खाडीचे व जेटीचे कागद कोणाकडे असतील, सरकारने खाडीच्या व जेटीच्या जागेचे अजून खासगीकरण केलेले नाही. जर पालिका जेटीवर हायमस्ट लावू शकते, मग पाण्याची सुविधा का उपलब्ध करून देत नाही. हायमस्टसाठी कोणाची कागदपत्र पालिकेने जमा करून घेतली आहे. सिडकोने धोकादायक ठरविलेल्या इमारतींमध्ये, गावठाणातील इमारतींमध्ये, घरपट्टीचा आधार घेत बांधलेल्या इमारतींमध्ये आजही सर्रासपणे चोरीचे पाणी वापरले जात आहे. हे माहिती असूनही आपण कानाडोळा करत असल्याचा संताप पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
सारसोळेचे ग्रामस्थ जे या भुमीपुत्र आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, मुळ मालक आहेत, त्यांना त्यांच्याच जेटीवर पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र महापालिका प्रशासन का करत आहे. समस्या गंभीर आहे, पायाचे आजार वाढू लागले आहेत. चोरीचे पाणी आपण थांबवू शकत नाही तर भुमीपुत्र असणार्या सारसोळेच्या ग्रामस्थांना जेटीवर पाण्याच्या नळापासून का वंचित ठेवता. सारसोळेच्या ग्रामस्थांना अनधिकृत नळजोडणीतून नाही तर अधिकृत नळजोडणीतून लवकरात लवकर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.