महासभेत ठराव मंजुर
नवी मुंबई ; कष्टकरी कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा या लोकनेेते गणेश नाईक यांच्या लोकहिताय धोरणानुसार नवी मुंबई पालिकेतील विविध विभागात कार्यरत सुमारे ५७०० कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत या कामगारांना किमान वेतनातील २४ फेब्रुवारी २०१५ पासून १३ महिन्यांच्या वेतनाचा फरक अदा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला त्यामुळे या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू व्हावे तसेच त्यांच्या वेतनाची तफावत त्यांच्या पदरात पडावी यासाठी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच लोकनेते गणेश नाईक संस्थापित श्रमिक सेनेने पुढाकार घेतला होता. श्रमिक सेनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांच्याजवळ या कंत्राटी कामगारांनी न्याय मिळावा म्हणून विनंती केली होती. लोकनेते गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार डॉ. नाईक यांनी या कामगारांची बैठक घेतली होती. महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक या बैठकीस उपस्थित होते. डॉ. संजीव नाईक यांच्यासह माजी महापौर सागर नाईक आणि पालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी तत्कालिन महापौर आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनावणे यांची भेट घेवून या कंत्राटींसाठी किमान वेतनाचा ठराव मंजुर करुन घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार किमान वेतनाचा ठराव महासभेत मंजुर करण्यात आला होता. या नंतर कंत्राटींना किमान वेतनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी तत्कालिन स्थायी समितीच्या सभापती आणि विद्यमान नगरसेविका शुभांगी पाटील यांच्या कार्यकाळात सत्ताधारी राष्ट्रवादीने ७० कोटी रुपयांची तरतूद २०१८-२०१९च्या अर्थसंकल्पात करुन घेतली होती. ही ७० कोटी रुपयांची तरतूद वाटपास मंगळवारी महासभेने मंजूुरी दिली.
या ठरावावर चर्चा करताना नगरसेवक सुरज पाटील म्हणाले की, लोकनेते गणेश नाईक यांच्यामुळे कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. कचरा वाहतूक कामगारांना देखील किमान वेतन मिळावे, अशी मागणी आहे.
नगरसेवक सुधाकर सोनावणे म्हणाले की मागील महासभेतच हा विषय मंजुर होणार होता मात्र काही सदस्यांनी गोधळ घातल्याने तो मंजूर होवू शकला नाही. यापूर्वी देखील कंत्राटींना समान कामास समान वेतन देण्यात आले होते.
लोकनेते गणेश नाईक यांच्यामुळे कंत्राटींना किमान वेतनाचा लाभ मिळाला आहे याचा आम्हाला अभिमान आहे, अशा भावना नगरसेवक निवृत्ती जगताप यांनी व्यक्त केल्या.
किमान वेतनाच्या फरकातील पुढील टप्प्यातील फरकाची रक्कम कामगारांना लवकरात लवकर अदा करावी, अशी मागणी सभागृहनेते रविंद्र इथापे यांनी केली. लोकनेते गणेश नाईक आणि डॉ. संजीव नाईक यांचे त्यांनी आभार मानले.
महापौर जयवंत सुतार म्हणाले की, कंत्राटींना किमान वेतन लागू करणारी नवी मुंबई महापालिका ही पाहिली महापालिका आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या सुचनेनुसार दुसर्या टप्प्यातील फरकाची रक्कम देखील लवकरात लवकर अदा करण्यात येईल. कचरा वाहतुक कामगारांना देखील किमान वेतन लागू करण्यात येईल. एकही कामगार वंचित राहणार नाही.
घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, क्रीडा, विष्णुदास भावे नाटयगृह, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, स्मशानभूमी इत्यादी विभागातील ५७०० कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी लोकनेते गणेश नाईक आणि सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे आभार मानले आहेत. किमान वेतनातील फरक अदा करण्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर झाल्यावर पालिका मुख्यालयाबाहेर जमलेल्या कंत्राटी कामगारांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनंत सुतार, सभागृहनेते रविंद्र इथापे, नगरसेवक सुरज पाटील आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे आभार मानले आहेत.
प्रतिक्रीया …
श्रमिक सेनेचे पदाधिकारी आणि कमिटी सदस्यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी केली होती. लोकनेते गणेश नाईक यांच्या सुचनेनुसार तत्कालिन महापौर सुधाकर सोनावणे, तत्कालिन स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांनी पालिका बजेटमध्ये पहिल्या टप्प्याकरीता ७० कोटी रुपयांची तरतूद केली. विद्यमान महापौर जयवंत सुतार, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी देखील पुढाकार घेतला. पालिका आयुक्तांनी तशा प्रकारचा प्रस्ताव आणला. या सर्वांचे आम्ही श्रमिक सेनेच्या वतीने आभार मानतो. उर्वरित टप्प्यातील फरकाची रक्कम देखील या कामगारांना लवकरात लवकर अदा करावी आणि त्यांच्या आनंदात भर घालावी.
– डॉ संजीव गणेश नाईक, अध्यक्ष श्रमिक सेना, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस