दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आधुनिकतेला प्राधान्य देत नवनवीन लोकोपयोगी संकल्पना राबविण्यात आघाडीवर रहिली असून काळाची पावले ओळखून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी सी.बी.एस.सी. बोर्डाच्या कोपरखैरणे आणि नेरूळ येथे दोन शाळा सुरू करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 50, नेरूळ येथे सी.बी.एस.ई. बोर्ड महानगरपालिका शाळा क्र. 93 च्या शुभारंभप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपिठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्रीम.मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, अ प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक श्री. विशाल डोळस, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री.गणेश म्हात्रे, श्री. सुनिल पाटील, श्रीम. शिल्पा कांबळी, अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये व श्री. सुनिल लाड, आकांक्षा फाऊंडेशनच्या पदाधिकारी श्रीम. शिवगामी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नवी मुंबई महानगरपालिकेने सी.बी.एस.बोर्ड शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा या भागातील विद्यार्थी, पालकांना समाधान देणार असल्याचे सांगत महानगरपालिकेच्या निर्णयाचे कौतुक केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील महापालिका शाळांमध्ये डिजीटल संगणक कक्षासाठी 66 लक्ष रूपयांचा आमदार निधी उपलब्ध करून देणार येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी बोलताना आजच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमाचे असलेले महत्व विषद केले. सर्वसामान्य घरांतील पालकांच्या मनात असलेली आपल्या मुलाला सी.बी.एस.सी. शाळेत शिकावे ही इच्छा याव्दारे पूर्णत्वास येत असल्याचे सांगत येथील शिक्षणाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाईल असे सांगतानाच पालकांनीही त्यादृष्टीने मुलाच्या अभ्यासात मदतीची भूमिका ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
अ प्रभाग समितीचे अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक श्री. विशाल डोळस यांनी प्रभागात सी.बी.एस.ई. शाळा सुरू होत असल्याने सातत्याने करीत असलेल्या मागणीची पूर्तता होत असल्याचा व नागरिकांची इच्छा पूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त केला.
शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना दरवर्षी महानगरपालिका शाळांतील पटसंख्येमध्ये वाढ होत असून यावर्षीही 1 हजाराने पटसंख्या वाढली असल्याचे सांगत पालकांचा हा वाढता विश्वास कायम जपत सी.बी.एस.सी. बोर्डाच्या नेरूळ व कोपरखैरणे येथील शाळांतूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जाईल असे सांगितले. आकांक्षा फाऊंडेशनच्या वतीने संचलित होणा-या या सी.बी.एस.ई. बोर्ड शाळेत यावर्षी इयत्ता पहिलीचे वर्ग सुरु करण्यात येत असून शाळेत प्रवेश घेतलेल्या 20 मुलांना याप्रसंगी शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.